नवी दिल्ली : ब्रिटिश दूरसंचार कंपनी व्होडाफोनने इंडस टॉवर्समधील तीन टक्के हिस्सेदारी कमी केली आहे. यातून २,८४१ कोटी रुपयांचा निधी उभा राहिला असून यातून व्होडाफोन आयडियाचे कर्ज फेडले जाणार आहे. मुंबई शेअर बाजारातील बुधवारच्या सत्रातील इंडस टॉवर्सच्या ३५८.७५ या बंद भावानुसार, २,८४१ कोटी रुपये मूल्याचे समभाग आहेत.
हेही वाचा >>> सेवा क्षेत्राच्या वाढीचा वेग मंदावला; नोव्हें
व्होडाफोनने इंडस टॉवर्स लिमिटेडमध्ये त्यांचे उर्वरित सात कोटी समभाग म्हणजेच सुमारे तीन टक्के समभाग बुक-बिल्ड ऑफरद्वारे सादर केल्याची घोषणा केली आहे. यानंतर, इंडस टॉवर्समधील व्होडाफोनची हिस्सेदारी एक टक्क्याच्या खाली जाईल. या व्यवहारापूर्वी व्होडाफोनकडे इंडस टॉवर्समध्ये ३.१ टक्के हिस्सेदारी होती. जूनमध्ये व्होडाफोनने इंडस टॉवर्समधील १८ टक्के हिस्सेदारी सुमारे १५,३०० कोटी रुपयांना विकली होती. इंडस टॉवर्समधील व्होडाफोनचा उर्वरित हिस्सा दूरसंचार टॉवर कंपन्यांना मास्टर सर्व्हिसेस ॲग्रीमेंट्सअंतर्गत व्होडाफोन आयडियाच्या दायित्वांची हमी देण्यासाठी उपलब्ध असेल.