मुंबईः वाडिया समूहाच्या मालकीची स्वस्त दरातील प्रवासी विमानसेवा ‘गो फर्स्ट’ने (पूर्वीची ‘गो एअर’) निधीच्या तीव्र चणचणीमुळे पुढील दोन दिवसांची (३ आणि ४ मे) उड्डाणे तात्पुरती स्थगित करत असल्याचे जाहीर करतानाच, राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरणाच्या (एनसीएलटी) दिल्लीच्या खंडपीठापुढे स्वेच्छेने दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेसाठी अर्ज दाखल केला असल्याचे मंगळवारी स्पष्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एनसीएलटीने अर्ज दाखल करून घेतल्यानंतर उड्डाणे पुन्हा सुरू केली जातील, असे गो फर्स्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौशिक खोना यांनी सांगितले. देशांतर्गत स्वस्त दरातील या विमानसेवेने सर्व भागधारकांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी हे पाऊल उचलले असल्याचे त्यांनी सांगितले. कंपनीला निधीची चणचण का भासत आहे हे स्पष्ट करताना खोना यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, विशेष इंजिन पुरवठादार प्रॅट अँड व्हिटनी (पी अँड डब्ल्यू) या कंपनीने अपेक्षेप्रमाणे इंजिनचा पुरवठा न केल्यामुळे या विमानसेवेच्या ताफ्यातील निम्म्याहून अधिक म्हणजे २८ विमाने जमिनीला खिळलेली आहेत आणि प्रचंड आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.

गो फर्स्टच्या प्रवर्तकांनी गेल्या तीन वर्षांत या विमानसेवेमध्ये ३,२०० कोटी रुपयांचा भरीव निधी ओतल्यानंतरही हे पाऊल उचलणे कंपनीला अपरिहार्य पडले आहे. विमानसेवेला तिच्या ताफ्यातील एअरबस ए३२० निओ विमानांपैकी जवळपास ५० टक्के विमाने ही प्रॅट अँड व्हिटनीच्या इंजिनांतील ‘क्रमिक सदोषते’मुळे उड्डाणासाठी न वापरता जमिनीला खिळून ठेवावी लागली आहेत. क्रमिक सदोषता म्हणजे इंजिनाच्या कोणत्याही विशिष्ट भागाच्या पाच टक्के किंवा अधिक घटकांच्या संदर्भात भेडसावणारा बिघाड किंवा गैर-अनुरूपता आहे. प्रॅट अँड व्हिटनीच्या इंजिनातील सदोषतेमुळे गमावला गेलेला महसूल आणि अतिरिक्त खर्चामध्ये गो फर्स्टला सुमारे १०,८०० कोटी रुपयांनी नुकसान झाले आहे.

तोट्यात असलेल्या विमानसेवेने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रॅट अँड व्हिटनी इंटरनॅशनल एरो इंजिन्स, एलएलसी या कंपनीद्वारे पुरविल्या गेलेल्या सदोष इंजिनांच्या वाढत्या संख्येमुळे गो फर्स्टला हे पाऊल उचलावे लागले. ज्यामुळे गो फर्स्टला ताफ्यातील निम्म्याने विमाने उड्डाणांविना राखून ठेवावी लागली. जमिनीला खिळून राहिलेल्या विमानांची टक्केवारी डिसेंबर २०१९ मधील ७ टक्क्यांवरून, डिसेंबर २०२० मध्ये ३१ टक्क्यांपर्यंत, तर डिसेंबर २०२२ मध्ये ५० टक्क्यांपर्यंत वाढली आहे. प्रॅट अँड व्हिटनीने अनेक वर्षांपासून निव्वळ आश्वासने दिली असून ती पूर्ण करण्यात ही कंपनी वारंवार अपयशी ठरली आहे.

गो फर्स्टच्या एअरबस ए३२० निओ विमानांच्या ताफ्यासाठी विशेष इंजिन पुरवठादार प्रॅट अँड व्हिटनी यांनी सिंगापूर आंतरराष्ट्रीय लवाद केंद्राने नियमांनुसार नियुक्त केलेल्या आपत्कालीन लवादाने दिलेल्या निवाड्याचे पालन करण्यास नकार दिल्यानंतर गो फर्स्टला एनसीएलटीकडे अर्ज करण्यास भाग पाडले गेले. त्या आदेशानुसार प्रॅट अँड व्हिटनीला २७ एप्रिल २०२३ पर्यंत किमान १० सेवायोग्य जादा भाडेतत्त्वावर दिलेली इंजिन आणि डिसेंबर २०२३ पर्यंत दरमहा आणखी १० जादा इंजिने गो फर्स्टला विनाविलंब देण्यासाठी सर्व वाजवी पावले उचलण्याचे निर्देश दिले गेले होते. त्या आधारे पूर्ण क्षमतेने उड्डाणे सुरू करून गो फर्स्टला आर्थिक पुनर्वसन आणि तग धरणे शक्य होणार होते, असे या विमानसेवेने प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

‘डीजीसीए’कडून नोटीस

विमान कंपनीने सरकारला घडामोडींची पूर्ण माहिती दिली आहे आणि विमान वाहतूक नियामक ‘नागरी विमान वाहतूक महासंचालनालय (डीजीसीए)’ कडे तपशीलवार अहवालदेखील सादर केला जाईल, असे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. दरम्यान, डीजीसीएने गो फर्स्टला ३ मे आणि ४ मेची उड्डाणे रद्द करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. ५,००० हून अधिक कर्मचारी असलेल्या गो फर्स्टला गेल्या दोन महिन्यांपासून १० विमानांसाठी भाडेपट्टीची देय रक्कम भरता आलेली नाही, अशी माहिती कंपनीच्याच अधिकाऱ्यांनी महिनाभरापूर्वी दिली आहे.

“आपल्याच कंपनीला दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेसाठी स्वतःलाच दाखल करावे लागणे हा एक दुर्दैवी निर्णय आहे, परंतु कंपनीच्या हिताचे रक्षण करण्यासाठी ते करणे भाग पडले.”- कौशिक खोना, मुख्य कार्यकारी अधिकारी, गो फर्स्ट

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wadia group owned low cost airline go first temporarily suspends flights due to severe funding crunch amy
Show comments