मुंबई : वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हॅथवेने डिजिटल देयक व्यासपीठ ‘पेटीएम’ची प्रवर्तक ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’मधील संपूर्ण २.४६ टक्के समभागांची विक्री केली. सुमारे १,३७१ कोटी रुपये मूल्याच्या समभागांची खुल्या बाजारातून विक्री करण्यात आली. बर्कशायर हॅथवे इंकने तिच्या संलग्न बीएच इंटरनॅशनल होल्डिंग्सद्वारे राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर पेटीएमचे १.५६ कोटीपेक्षा जास्त समभागांची विक्री केली. या समभागांची प्रत्येकी ८७७.२९ रुपयांप्रमाणे विक्री करण्यात आली.
दरम्यान, कॉप्थॉल मॉरिशस इन्व्हेस्टमेंटने ७५.७५ लाख समभाग आणि घिसालो मास्टर फंड एलपीने सुमारे ४२.७५ लाख समभागांची खरेदी केली आहे. म्हणजेच पेटीएममधील त्यांची हिस्सेदारी आता अनुक्रमे १.१९ टक्के आणि ०.६७ टक्के आहे. शुक्रवारच्या सत्रात राष्ट्रीय शेअर बाजारात ‘वन ९७ कम्युनिकेशन्स’चा समभाग ३.०८ टक्क्यांनी ८९५ रुपयांवर बंद झाला.
हेही वाचा : सुझुकीच्या ‘मारुती’मधील हिस्सेदारीत वाढ
सप्टेंबर अखेर सरलेल्या दुसऱ्या तिमाहीत पेटीएमचा एकत्रित तोटा २९१.७ कोटी रुपयांपर्यंत खाली आला आहे. गेल्यावर्षी याच तिमाहीत कंपनीला ५७१.५ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. सरलेल्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित महसूल सुमारे ३२ टक्क्यांनी वाढून २,५१८.६ कोटींवर पोहोचला आहे. जो एका वर्षापूर्वी १,९१४ कोटी रुपये होता.