Making Charges In Gold Jwellery : प्रत्येकाला सोन्याचे दागिने परिधान करायला आवडतात. आपापल्या परिस्थितीनुसार जास्तीत जास्त सोने अंगावर कसे घालता येईल, याच प्रयत्नात अनेक जण असतात. जेव्हा तुम्ही सोन्याचे दागिने खरेदी करता तेव्हा सोन्याच्या किमतीसह तुम्ही दागिन्यांचा मेकिंग चार्ज देखील भरावा लागतो. एवढेच नाही तर यानंतरही तुम्हाला जीएसटी भरावा लागतो. शेवटी मेकिंग चार्ज कसा ठरवला जातो? दागिन्यांच्या एकूण किमतीमध्ये किती मेकिंग चार्ज समाविष्ट आहे? याबद्दल जाणून घेऊयात.
मेकिंग चार्ज म्हणजे काय?
दागिने घडवण्यासाठी लागणारा वेळ त्यानुसार त्या दागिन्यांवर मेकिंग चार्ज आकारला जातो. सोने किलोच्या प्रमाणात घेऊन नंतर कारागीर ते वेगवेगळ्या दागिन्यांच्या रूपात तयार करतात. ज्यावर १० ते ३० टक्के मेकिंग चार्ज असू शकतो. हे दागिन्यांवर केलेल्या कामाच्या तपशीलावर अवलंबून असते. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास मेकिंग चार्ज म्हणजे सोन्याचे दागिने बनवण्यासाठी कारागिराची फी असते. डिझाईन जितके अधिक विस्तृत असेल, तितका मेकिंग चार्ज आकारला जातो आणि डिझाइन जितके सोपे असेल, तितका मेकिंग चार्ज कमी द्यावा लागतो.
मेकिंग चार्ज कशा पद्धतीने आकारला जातो?
मेकिंग चार्ज कसा आकारला जातो ते सोप्या पद्धतीने समजून घेऊ यात. समजा, तुम्ही सोन्याची अंगठी खरेदी केली आहे, ज्यामध्ये ४० हजार रुपये किमतीचे सोने आहे. जर मेकिंग चार्ज १० टक्के असेल तर याचा अर्थ तुम्हाला त्यावर ४,००० रुपये जास्त द्यावे लागतील. त्यानुसार त्या अंगठीची किंमत ४४ हजार रुपये असेल. मेकिंग चार्जेस हे सोन्याच्या वजनापेक्षा वेगळे असतात. मेकिंग चार्ज हा दागिन्यांच्या अंतिम किमतीचा मोठा भाग असतो. दागिन्यांनुसार मेकिंग चार्जेस निश्चित केले जातात.
मेकिंग चार्ज कसा कमी करता येतो?
दागिने खरेदी करताना तुम्हाला फारसा मेकिंग चार्जेस द्यावे लागणार नाही, असे तुम्हाला वाटत असेल, तर दागिन्यांच्या डिझाइनमध्ये अवाजवी कारागिरी करू नका. तुम्ही जितके तपशीलवार काम मागाल तितका मेकिंग चार्ज वाढेल. त्यामुळे शुल्क आकारू नये म्हणून साध्या डिझाइनचे दागिने खरेदी करा. महत्त्वाचे म्हणजे मेकिंग चार्ज कितीही जास्त असला तरी जेव्हा तुम्ही ते सोने परत विकता, तेव्हा तुम्हाला त्याची योग्य किंमत मिळत नाही. कारण त्यात मेकिंग चार्जेस समाविष्ट नसतो.