मुंबई: संदेशन प्रणालीत महत्त्वाची भूमिका बजावत असलेल्या व्हॉट्सअॅपने आता छोट्या व्यापाऱ्यांना त्यांच्या लक्ष्यित ग्राहकांपर्यंत पोहचता यावे आणि त्यायोगे व्यवसायवाढीची संधी त्यांना मिळावी, यासाठी कृत्रिम प्रज्ञा (एआय) तंत्रज्ञानाने समर्थ अनेक नव्या वैशिष्ट्यांना सामावून घेतले आहे. आगामी सणासुदीच्या काळात विशेषत: छोट्या व ग्रामीण व्यवसायांना केंद्रित करून त्याने हाती घेतलेल्या विशेष उपक्रमांची गुरुवारी येथे आयोजित पहिल्या ‘व्हॉट्सअॅप बिझनेस समिट’मध्ये घोषणा करण्यात आली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> व्याजदरांबाबत RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचं मोठं विधान; म्हणाले, “महागाई आटोक्यात येतेय, पण…”

व्हॉट्सअॅप बिझनेस अॅपचा वापर देशातील अनेक बडे व्यावसायिक सध्या करतात. मात्र लघु व्यावसायिक देखील आवश्यक डिजिटल कौशल्ये विकसित करून भारताच्या डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना देऊ शकतात. यासाठी आवश्यक जनजागरण आणि प्रशिक्षणासाठी व्हॉट्सअॅपने ‘भारत यात्रे’चे आयोजन केले आहे. देशातील १० प्रमुख शहरांमध्ये सुमारे ६,००० किलोमीटरचे अंतर कापून २० हजारांहून अधिक छोट्या व्यवसायांपर्यंत पोहोचण्याचे लक्ष्य या यात्रेचे आहे, असे मेटा इंडियाचे बिझनेस मेसेजिंग विभागाचे संचालक रवी गर्ग यांनी स्पष्ट केले.

या उपक्रमाचा भाग म्हणून लघु व्यवसायांना व्हॉट्सअॅपवर त्यांचे व्यावसायिक खाते, विशेष पान स्थापित करण्याचे, उत्पादनांची सचित्र सूची तयार करण्याची, व्हॉट्सअॅपवर मिळविल्या जाणाऱ्या जाहिरातींना त्यांच्या विशेष पानावर स्थापित करण्याचे प्रशिक्षण दिले जाईल. शिवाय, व्यावसायिकांबद्दल ग्राहकांमध्ये विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी सर्व दस्तऐवजांची छाननी व पूर्णपणे खात्री करून, सत्यापित खूण (मेटा व्हेरिफाइड बॅज), तोतयागिरीपासून संरक्षण, सुरक्षाविषयक पाठबळ अशा वैशिष्ट्यपूर्ण सेवा व्यापारी-व्यावसायिक मासिक शुल्क भरून मिळवू शकतील.

याबाबत मत व्यक्त करताना, भारतातील मेटाच्या उपाध्यक्ष संध्या देवनाथन म्हणाल्या, ‘सर्वव्यापकता व सुलभता यातून व्हॉट्सअॅपला भारतातील व्यावसायिक परिवर्तनाचे मुख्य केंद्र बनवताना, छोट्या व्यवसायांना लक्षवेधी संकल्पनांद्वारे त्यांच्या विकासाच्या नवीन प्रारूपांना चालना देण्यास मदत करण्याचा उद्देश आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Whatsapp special campaign focused on small businesses print eco news zws