पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी बुधवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीसंदर्भात मोठे वक्तव्य जारी केले आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सरकार लवकरच पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कपात करू शकते, असे सांगण्यात येत असतानाच पेट्रोलियम मंत्र्यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झालं आहे. कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा अंदाज अनेक दिवसांपासून वर्तवला जात आहे. डिसेंबर महिन्यात कच्च्या तेलाची सरासरी किंमत प्रति बॅरल ८० डॉलरच्या खाली राहून ७५ ते ७७ डॉलर प्रति बॅरलदरम्यान राहिली. त्यामुळे देशातील तेल कंपन्यांना मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या कमी दराचा फायदा सर्वसामान्यांनाही मिळावा, अशी सरकारची इच्छा आहे. पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी याविषयी काय म्हणाले हेदेखील जाणून घेऊ यात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सांगितले की, सरकारी तेल कंपन्या इंधनाच्या किमती कमी करण्याबाबत केंद्राशी चर्चा करीत नाहीत. ते म्हणाले की, सर्व मीडिया रिपोर्ट्स केवळ अनुमानांवर आधारित आहेत. त्या बातम्यांमध्ये तथ्य नाही. अशा कोणत्याही मुद्द्यावर सरकारच्या तेल कंपन्यांशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे पेट्रोलियम मंत्र्यांनी स्पष्ट केले. सध्या प्रचंड अशांततेचे वातावरण आहे, जागतिक नकाशावर दोन भागात संघर्ष सुरू आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती अस्थिर आहेत. २०२४ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी सोशल मीडियावर पेट्रोल आणि डिझेलच्या किमती कमी झाल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र, पुरी म्हणाले की, इंधनाच्या दरात कपातीचे हे वृत्त दिशाभूल करणारे आहे.

ब्रेंट क्रूडच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात घसरल्या

याआधी डिसेंबरमध्ये पीटीआय या वृत्तसंस्थेने अर्थ मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचा हवाला देत पेट्रोल आणि डिझेलवरील कर कमी करण्याच्या शक्यतेबाबत सांगितले होते. त्या वेळी अधिकाऱ्याने सांगितले की, ब्रेंट क्रूडच्या किमती आंतरराष्ट्रीय बाजारात आधीच घसरल्या आहेत आणि त्यामुळे इंधन उत्पादन शुल्कात कपात करण्याचे कोणतेही प्रकरण नाही. पीटीआयने अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितले की, जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती जास्त होत्या, तेव्हा आम्ही उत्पादन शुल्क कमी केले. जेव्हा किमती आधीच खाली आल्या आहेत, तेव्हा कर कपातीचा प्रश्नच उद्भवत नाही. तुम्ही (पेट्रोल आणि डिझेलच्या) किमती कमी करण्याची मागणी करू शकता, परंतु कर कपातीमुळे असे होणार नाही.

तेल कंपन्यांना हजारो कोटी रुपयांचा नफा

जर तेल कंपन्या नफ्यात आहेत, तर पेट्रोल आणि डिझेलचे दर का कमी केले जात नाहीत. डिसेंबरमधील सरकारी रिपोर्टनुसार, तेल कंपन्यांना २०२२ मध्ये पेट्रोलवर प्रति लिटर १७ रुपये आणि डिझेलवर ३५ रुपये प्रति लिटर तोटा सहन करावा लागला होता. आकडेवारीनुसार, पेट्रोलवर प्रतिलिटर ८-१० रुपये आणि डिझेलवर ३-४ रुपये नफा होतो. तेल कंपन्यांचे तीन तिमाही निकाल पाहिले तर हजारो कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्यानंतरही पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही.

हेही वाचाः Money Mantra : UPI चा नवा विक्रम, २०२३ मध्ये १०० अब्ज व्यवहारांचा टप्पा केला पार

कच्चे तेल सुमारे ७ टक्क्यांनी स्वस्त झाले

लाल समुद्रात तेलवाहू जहाजांच्या टँकरवर हुथींनी केलेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाली होती. २६ डिसेंबर रोजी कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ८१.०७ डॉलरवर पोहोचली होती. कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ९० डॉलरच्या जवळपास पोहोचेल, असे वाटत होते, पण तसे झाले नाही. २६ डिसेंबरपासून ब्रेंट क्रूड तेलाच्या किमतीत सुमारे ७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. दुसरीकडे अमेरिकन कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७० डॉलरच्या खाली गेली आहे. २६ डिसेंबरपासून कच्च्या तेलाच्या किमतीत ७ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे.

हेही वाचाः हिंडेनबर्ग प्रकरणात SC च्या निकालानंतर गौतम अदाणींची पहिली प्रतिक्रिया; ”सत्यमेव जयते…”

भारत ८५ टक्के आयात करतो

पुरी म्हणाले की, भारत सध्या तेल स्त्रोतांमध्ये विविधता आणण्यावर भर देत आहे. सध्या भारत आपल्या तेलाच्या ८५ टक्क्यांहून अधिक गरजा भागवण्यासाठी आयातीवर अवलंबून आहे. पुरी म्हणाले की, भारत व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करेल, भारतीय रिफायनरीज दक्षिण आफ्रिकेतील देशातून जड तेलावर प्रक्रिया करण्यास सक्षम आहेत. नवी दिल्ली कोणत्याही देशाशी तेल आयात पुन्हा सुरू करू शकते, ज्यावर कोणतेही निर्बंध नाहीत.आम्ही अशा परिस्थितीत आहोत की, आम्ही दररोज ५ दशलक्ष बॅरल कच्चे तेल वापरत आहोत आणि ते दररोज वाढत आहे. व्हेनेझुएलाचे तेल बाजारात आले तर आम्ही त्याचे स्वागत करू. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आलेखानुसार, नोव्हेंबर २०२१ ते नोव्हेंबर २०२३ दरम्यान भारतात पेट्रोलच्या किमतीत ११.८२ टक्के आणि डिझेलच्या किमतीत ८.९४ टक्क्यांनी घट झाली आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: When will petrol and diesel become cheaper petroleum minister himself made it clear vrd