पीटीआय, नवी दिल्ली
देशात हिमाचल प्रदेशात सर्वाधिक बेरोजगारी असल्याचे जुलै ते सप्टेंबर तिमाहीच्या मनुष्यबळ सर्वेक्षणातून सोमवारी समोर आले. या काळात हिमाचल प्रदेशात बेरोजगारीचा दर ३३.९ टक्के होता, तर त्याखालोखाल राजस्थानमध्ये ३०.२ टक्के दर सर्वेक्षणाने नोंदवला होता. हा बेरोजगारीचा दर १५ ते २९ वयोगटातील तरुण-तरुणींतील आहे.
राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने याबाबतचा अहवाल जाहीर केला आहे. यानुसार, हिमाचलमध्ये चालू आर्थिक वर्षात जुलै ते सप्टेंबर तिमाहीत १५ ते २९ वयोगटातील बेरोजगारीचा दर शहरी भागात महिलांमध्ये तब्बल ४९.२ टक्के नोंदविण्यात आला असून, पुरुषांचा बेरोजगारीचा दर २५.३ टक्के आहे. राजस्थानमध्ये शहरी भागात बेरोजगारीचा दर महिलांमध्ये ३९.४ टक्के आणि पुरुषांमध्ये २७.२ टक्के आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये शहरी भागात बेरोजगारीचा दर २९.८ टक्के आहे. तेथे बेरोजगारीचा दर महिलांमध्ये ५१.८ टक्के आणि पुरुषांमध्ये १९.८ टक्के आहे.
हेही वाचा – SAT कडून मुकेश अंबानी आणि नवी मुंबई SEZ ला दिलासा, दंड भरण्याचा सेबीचा आदेश रद्द
देशात १७.३ टक्के तरुण रोजगारहीन
सर्वेक्षणाच्या आधीच्या आठवड्यातील परिस्थिती पाहता देशातील एकूण बेरोजगारीचे प्रमाण १७.३ टक्के नोंदविण्यात आले आहे. शहरी भागात ते २२.९ टक्के आहे. महिलांमध्ये तो १५.५ टक्के आहे. बेरोजगारीचा दर एकूण कामकरी वयातील लोकसंख्येपैकी बेरोजगार व्यक्तींच्या प्रमाणात ठरतो. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाने एप्रिल २०१७ पासून तिमाही मनुष्यबळ सर्वेक्षण अहवाल जाहीर करण्यास सुरुवात केली. आता जुलै ते सप्टेंबर तिमाहीतील हा २०वा अहवाल आहे.
हेही वाचा – सेन्सेक्स-निफ्टी नव्या शिखरावर;भांडवली बाजारांत निवडणूक निकालांचे स्वागत
गुजरातमध्ये सर्वांत कमी
देशभरात एकूण २२ राज्यांत सर्वेक्षण करून हा अहवाल तयार करण्यात आला आहे. जुलै ते सप्टेंबर तिमाहीत गुजरात राज्यात बेरोजगारीचा दर सर्वाधिक कमी आहे. गुजरातमध्ये तो ७.१ टक्के आहे. त्यानंतर दिल्लीत तो ८.४ टक्के असा सर्वात कमी दर नोंदविण्यात आला आहे.