Who is Indian American Vaniya Agrawal who Shame Satya Nadella and Bill Gates : मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमीत्त वॉशिंग्टनच्या रेडमंड येथील मुख्यालयात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कर्यक्रमात पॅलेस्टाईन समर्थकांनी दोन वेळा व्यत्यय आणल्याचा प्रकार घडला. विशेष म्हणजे दोन्ही वेळा कार्यक्रमात व्यत्यय आणणाऱ्या या महिला कर्मचारी होत्या. आणखी एकसारखी बाब म्हणजे या दोघींनी कार्यक्रमस्थळी आंदोलन करण्यासंबंधी कंपनीला इमेल पाठवले होते. या दोन्ही महिलांनी मायक्रोसॉफ्टचे सध्याचे आणि माजी सीईओ यांच्या समोर इस्रायलच्या लष्कराला कृत्रिम बुद्धिमत्ता पुरविल्याबद्दल जोरदार निषेध नोंदवला.
पहिल्या घटनेत सॉफ्टेवेअर इंजिनियर इब्तिहाल अबूसद (Ibtihal Aboussad) ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स विभागात काम करणारी महिला मायक्रोसॉफ्ट एआय सीईओ मुस्तफा सुलेमान यांच्या भाषण सुरू असताना जोरात ओरडली. “मुस्तफा, शेम ऑन यू,” असे म्हणत ही महिला कर्मचारी स्टेजकडे चालत गेली.
तर दुसर्या घटनेत, एका भारतीय-अमेरिकन महिलेने देखील असाच काहीसा प्रकार केला. या महिलेचे नाव वानिया अग्रवाल असे आहे. या कार्यक्रमात मायक्रोसॉफ्टचे सध्याचे सीईओ सत्या नडेला आणि माजी सीईओ स्टीव्ह बाल्मर आणि बिल गेट्स स्टेजवर कंपनीसंबंधी बोलत होते. यादरम्यान वानिया अग्रवाल ही महिली उभी राहिली आणि मोठ्याने ओरडून, “तुम्हा सर्वांना लाज वाटली पाहिजे. तुम्ही सर्व ढोंगी आहात,” असे म्हणाली.
पुढे बोलताना ही महिला म्हणाली की, “मायक्रोसॉफ्टचे तंत्रज्ञान वापरून ५०,००० पॅलेस्टिनींची हत्या करण्यात आली. तुमची हिंमत कशी झाली. त्यांची हत्या साजरी केल्याबद्दल तुम्हाला लाज वाटली पाहिजे. इस्त्राइलशी संबंध तोडून टाका.” यानंतर त्या महिलेला सुरक्षारक्षक बाहेर घेऊन गेले. या घटनेच्या व्हायरल झालेल्या व्हिडीओनुसार काही कर्मचार्यांनी यावेळी तिची खिल्ली देखील उडवली.
MICROSOFT EMPLOYEE CALLS OUT CEO FOR SUPPORTING ISRAEL'S GENOCIDE Hatts off…pic.twitter.com/2wYU6YNUqL
— Salman (@SalmanGreen) April 7, 2025
त्यानंतर वानिया अग्रावाल (Vaniya Agrawal) यांनी ‘No Azure for Apartheid’ याचा उल्लेख केला, या गटाने मायक्रोसॉफ्टच्या कार्यालयाच्या आत आणि बाहेर दोन्ही ठिकाणी सुनियोजीत निदर्शने केल्याचे सांगितले जात आहे.
वानिया अग्रवाल कोण आहेत?
वानिया अग्रवाल या कंपनीच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस विभागात सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करतात. त्यांच्या नावावरून दिसून येतं की त्या भारतीय अमेरिकन आहेत. त्यांनी मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या ईमेलमध्ये आपण कंपनीत दीड वर्षांपासून कम करत असल्याबद्दल सांगितले आहे. वानिया अग्रवास यांचे लिंक्डइन किंवा ट्विटर अकाऊंट आढळले नाही, त्यामुळे त्यांच्याबद्दल अधिकची माहिती मिळू शकली नाही.
“नमस्कार, माझे नाव वानिया आहे आणि या कंपनीत दीड वर्ष एक सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम केल्यानंतर मी मायक्रोसॉफ्ट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. माझा शेवटचा दिवस पुढील शुक्रवार, ११ एप्रिल आहे. मायक्रोसॉफटच्या ५०व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात, सत्या नडेला यांच्या भाषणादरम्यान उभे राहून बोलताना कदाचित तुम्ही मला पाहीले असेल. मी कंपनी सोडण्याचा निर्णय का घेतला, आणि मी आज का बोलेले याबद्दल येथे सांगणार आहे,” असे वानिया यांनी त्यांच्या ईमेलमध्ये म्हटले आहे. त्यानंतर त्यांनी गाझामध्ये होत असलेल्या नरसंहारात मायक्रोसॉफ्टचा सहभाग असल्याचा दावा त्यांनी केला आहे.