नवी दिल्ली : खाद्यान्नांमध्ये किरकोळ घट झाली असली तरी, बिगर-खाद्य वस्तू, उत्पादित वस्तू तसेच इंधन आणि वीज यांच्या किमती वाढल्यामुळे सरलेल्या डिसेंबर २०२४ मध्ये घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित घाऊक महागाईचा दर वाढून २.३७ टक्क्यांवर पोहोचला आहे, असे मंगळवारी अधिकृत आकडेवारीने स्पष्ट केले.
नोव्हेंबर २०२४ मध्ये घाऊक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाई दर १.८९ टक्के पातळीवर होता. तर गेल्यावर्षी म्हणजेच डिसेंबर २०२३ मध्ये तो ०.८६ टक्क्यांपर्यंत ओसरला होता. तर ऑक्टोबर २०२४ मध्ये तो २.७५ टक्के पातळीवर होता.
खाद्यान्नांमधील किंमतवाढ डिसेंबर २०२४ मध्ये किरकोळ घटून ८.४७ टक्क्यांवर आली, जी नोव्हेंबरमध्ये ८.६३ टक्के पातळीवर होती. डिसेंबरमध्ये धान्य, डाळी आणि गहू यांच्या महागाईत घट झाली. मात्र, डिसेंबरमध्ये भाज्यांच्या किमती २८.६५ टक्के, बटाट्याच्या किमती ९३.२० टक्के आणि कांद्याच्या किमती १६.८१ टक्के अशा वाढ दराने उच्च पातळीवर कायम राहिल्या. तेलबियांसारख्या बिगर-खाद्य वस्तूंच्या किमती डिसेंबरमध्ये २.४६ टक्के वाढल्या, तर नोव्हेंबरमध्ये त्यात उणे ०.९८ टक्क्यांपर्यंत घसरण झाली होती.
हेही वाचा >>> इलेक्ट्रिक वाहनांबाबत ‘टीसीएस’ची महत्त्वपूर्ण भविष्यवाणी
इंधन आणि ऊर्जा श्रेणीमधील महागाई दर डिसेंबरमध्ये उणे ३.७९ टक्के राहिला होता, जो नोव्हेंबरमध्ये उणे ५.८३ टक्के नोंदवला गेला होता. उत्पादित वस्तूंचा, महागाई दर २.१४ टक्के राहिला आहे, जो नोव्हेंबरमध्ये २ टक्के होता.
तेल-आयात खर्चात लक्षणीय वाढ
घाऊक महागाई दरातील वाढ ही मुख्यतः इंधन-वीज आणि प्राथमिक बिगर-खाद्य वस्तूंमधील किंमतवाढीमुळे झाली आहे, असे ‘इक्रा’चे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ राहुल अग्रवाल म्हणाले. जानेवारी २०२५ मध्ये डिसेंबर २०२४ च्या तुलनेत प्रमुख जागतिक जिनसांच्या किमती वधारल्या आहेत. रशियातील तेल उत्पादक आणि तेल-जहाजांवर अमेरिकेने कडक निर्बंध लादल्यामुळे, विशेषतः खनिज तेलाच्या किमती १ ते १३ जानेवारी २०२५ दरम्यान सरासरी ५.८ टक्क्यांनी वाढल्या आहेत. याव्यतिरिक्त, डिसेंबर २०२४ च्या मध्यात अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रुपया ८६.५ पातळीच्या पुढे गेल्याने आयातीच्या खर्चात वाढ झाली आहे, असेही ते म्हणाले.