नवी दिल्ली : भाजीपाला, बटाटे, कांदा आणि खनिज तेलाच्या किमतीत वाढ झाल्यामुळे देशातील घाऊक महागाई दर मार्चमध्ये किरकोळ वाढून ०.५३ टक्के असा तीन महिन्यांच्या उच्चांकी नोंदवला गेला, असे सोमवारी वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीने स्पष्ट केले. दोन दिवसांपूर्वी जाहीर झालेला मार्चमधील किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के असा पाच महिन्यांच्या नीचांकी पातळीवर घसरला आहे.
हेही वाचा >>> रुपयाची विक्रमी नीचांकापर्यंत घसरण; रिझर्व्ह बँकेचा डॉलर विक्रीद्वारे हस्तक्षेप अयशस्वी
घाऊक किंमत निर्देशांकांवर आधारित महागाई दर २०२३ सालात एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत नकारात्मक पातळीवर होती आणि नोव्हेंबरमध्ये प्रथमच तो शून्याच्या वर ०.२६ टक्क्यांसह सकारात्मक पातळीवर आला. नोव्हेंबर २०२३ च्या तुलनेत आता मार्चमध्ये हा दर जवळपास दुप्पट झाला आहे. गेल्या वर्षी याच मार्च महिन्यात घाऊक महागाई दर १.४१ टक्के पातळीवर होता.
अन्नधान्याच्या किमतवाढीचा दर मार्चमध्ये किरकोळ वाढून ६.८८ टक्क्यांवर पोहोचला आहे, जो वर्षापूर्वी याच महिन्यात ५.४२ टक्क्यांवर होता. भाजीपाल्यातील महागाई दर सर्वाधिक १९.५२ टक्के होता. त्यापाठोपाठ बटाट्यासाठी ३६.८३ टक्के अधिक किंमत मोजावी लागली, तर कांद्याच्या दरात तब्बल ५६.९९ टक्क्यांनी वाढ झाली. अन्नधान्याच्या महागाईत वाढ मुख्यत्वे तृणधान्यांच्या किमतींमुळे झाली जी मार्चमध्ये ९ टक्के अशी १२ महिन्यांतील उच्चांकावर होती. डाळीही या महिन्यात १७.२ टक्क्यांनी महागल्या आहेत.
हेही वाचा >>> टेस्लातील १० टक्के कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर कुऱ्हाड, एलॉन मस्क यांनी मेलद्वारे दिला इशारा; म्हणाले, “खर्च कमी करण्यासाठी…”
जागतिक स्तरावर खनिज तेलाच्या कडाडलेल्या किमतींमुळे पेट्रोलियम घटकांच्या किमतीही मार्चमध्ये १०.२६ टक्क्यांनी वाढल्या आहेत. मागील वर्षी याच महिन्यात या घटकांच्या किमती २३.५३ टक्क्यांनी घटल्या होत्या.
केअरएज रेटिंग्स मुख्य अर्थतज्ज्ञ रजनी सिन्हा यांच्या मते, आगामी महिन्यांत घाऊक महागाई दर आणखी वाढेल असा अंदाज आहे. जागतिक वस्तूंच्या किमतींमध्ये अलीकडील वाढ, विशेषत: खनिज तेलाच्या उच्च किमती आणि औद्योगिक धातूंच्या किमतीत झालेली वाढ या घटकांचा महागाई दर वाढवणारा परिणाम दिसून येण्याची अपेक्षा आहे.