Apple iPhone : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ धोरणाचा चीनला फटका बसत असल्याचं पाहायला मिळत आहे. अमेरिका आणि चीनमध्ये ‘टॅरिफ वॉर’वरून वाढत्या व्यापार तणावाच्या पार्श्वभूमीवर अॅपल कंपनीने एक महत्वाचं पाऊल उचललं असल्याची माहिती समोर आली आहे. आता अमेरिकेत विकले जाणारे सर्व आयफोन भारतात बनवण्याची योजना अॅपल कंपनी आखत असल्याची माहिती सांगितली जात आहे.
अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धाच्या पार्श्वभूमीवर अॅपलने ही योजना आखली असल्याची माहिती एका अहवालातून समोर आली आहे. अहवालानुसार, अॅपल कंपनी चीनवरील अनिश्चित टॅरिफच्या कारवाईपासून वाचण्यासाठी अमेरिकेत विकले जाणारे सर्व आयफोन भारतात तयार करण्याचा विचार करत आहे. या संदर्भातील वृत्त इंडियन एक्स्प्रेसने दिलं आहे.
अॅपल कंपनी आपल्या उत्पादन धोरणात मोठा बदल करणार असून २०२६ च्या सुरुवातीपासून अॅपल कंपनी अमेरिकेत विकले जाणारे सर्व आयफोन भारतात बनवण्याची योजना सुरु करणार असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. अॅपल कंपनी भारतात आपले उत्पादन वाढवत आहे. फॉक्सकॉनने मार्चमध्ये १.३१ अब्ज डॉलर्स किमतीचे आयफोन विक्रीसाठी तयार केले, तर टाटा इलेक्ट्रॉनिक्सच्या आयफोन उत्पादनातही ६३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
अमेरिकेने चीनवर मोठ्या प्रमाणात कर लादल्यानंतर अॅपलने भारतात बनवलेले आयफोन अमेरिकेत विकण्यास सुरुवात केल्यामुळे ही भारतासाठी महत्वाची बाब मानली जात आहे. पुढील वर्षापर्यंत अमेरिकेत ६ कोटींहून अधिक आयफोन विकले जातील आणि ते भारतात बनवले जातील असं वृत्तात म्हटलं आहे, याचा अर्थ अॅपल भारतात आपल्या उत्पादनात दुप्पट वाढ करेल. अॅपल दरवर्षी अमेरिकेत ६ कोटींहून अधिक आयफोन विकते आणि गेल्या आर्थिक वर्षात त्यांनी भारतात एकूण २२ अब्ज डॉलर्स किमतीचे आयफोन तयार केले आहेत. जे त्यांच्या जागतिक उत्पादन क्षमतेच्या सुमारे २० टक्के आहे. या उत्पादनापैकी त्यांनी भारतातून सुमारे १८ अब्ज डॉलर्स किमतीचे आयफोन निर्यात केले आहेत.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यांनी चीनवर मोठ्या प्रमाणात आयातशुल्क लादल्यानंतर अॅपल अडचणीत सापडलं होतं. तसेच चीनलाही याचा सर्वाधिक फटका बसला. या आयातशुल्कामधून अमेरिकन प्रशासनाने स्मार्टफोन आणि संगणकांना अनेक करांमधून सूट दिली. पण तरीही भविष्यात नवीन शुल्क लागू होऊ शकते, ज्याचे ट्रम्प यांनी संकेत दिले आहेत. त्यामुळे जरी असे शुल्क लादले गेरे तरी भारताला तुलनेने खूपच कमी टॅरिफ लागू होईल. त्यामुळे भारतातून उत्पादन आणि निर्यात करणे हे अॅपलसाठी अधिक किफायतशीर प्रस्ताव असू शकते, त्यामुळे आता अॅपल भारतातील उत्पादन वाढवण्याची योजना आखत असल्याचं सांगितलं जात आहे.