थरमॅक्स लिमिटेडच्या मालकीची उपकंपनी फर्स्ट एनर्जी प्रायव्हेट लिमिटेडने (एफईपीएल) गुजरातमध्ये पवन-सौर संमिश्र ऊर्जा प्रकल्प उभारला असल्याचे गुरुवारी येथे जाहीर केले. या प्रकल्पाची क्षमता ४५.८० मेगावॉट आहे.
थरमॅक्सकडून अपांरपरिक ऊर्जा क्षेत्रात विस्ताराची पावले टाकली जात आहेत. याची सुरुवात म्हणून गुजरातमध्ये हा संमिश्र ऊर्जा प्रकल्प उभारण्यात आला आहे. या अत्याधुनिक प्रकल्पाची क्षमता पवनऊर्जेबाबत २४.३ मेगावॉट आणि सौरऊर्जेबाबत २१.५० मेगावॉट आहे. या प्रकल्पामुळे १ लाख ११ हजार ७०० टन कार्बन उत्सर्जन कमी होईल, असा अंदाज आहे.
हेही वाचाः महागाईविरोधात अर्धी लढाई अद्याप बाकी – शक्तिकांत दास
याबाबत थरमॅक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी आशीष भंडारी म्हणाले की, ग्राहकांच्या ऊर्जा स्थित्यंतरात त्यांचा विश्वासू सहयोगी होण्यासाठी आणि पर्यावरणपूरक भवितव्याकडे जाणाऱ्या शाश्वत ऊर्जेसाठी त्यांना सक्षम करण्याचा हा एक प्रयत्न आहे. गुजरातमधील पवन-सौर संमिश्र ऊर्जा प्रकल्पाची स्थापना हे त्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल आहे. अपांरपरिक ऊर्जा ही भविष्यासाठीची गरज बनली असल्याची त्यांनी पुस्ती जोडली.
हेही वाचाः इंग्लंडमध्ये सलग १३ व्यांदा व्याजदर वाढ; चलनवाढ नियंत्रणासाठी अपेक्षापेक्षा मोठी दरवाढ