मुंबई: माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रातील अग्रणी कंपनी विप्रोने शुक्रवारी पूर्वघोषित एकास-एक बक्षीस समभाग योजनेसाठी ३ डिसेंबर ‘रेकॉर्ड तारीख’ घोषित केली आहे. याचा अर्थ त्या तारखेला अथवा त्या आधी विप्रोचे भागधारक म्हणून नोंद असलेल्यांना या योजनेसाठी पात्र मानले जाईल. कंपनीने ‘रेकॉर्ड तारखे’ची घोषणा केल्यानंतर शुक्रवारच्या सत्रात विप्रोचा समभाग २.६० टक्कयांनी वधारून ५७१.६५ रुपयांवर स्थिरावला.
हेही वाचा : ‘सेबी’कडून प्रकटन नियमाच्या उल्लंघनाची चौकशी
गेल्या महिन्यात १७ ऑक्टोबर रोजी, विप्रोच्या संचालक मंडळाने प्रत्येकी दोन रुपये दर्शनी मूल्य असलेल्या एका समभागास एक बक्षीस समभाग (१:१ बोनस शेअर) देण्यास मान्यता दिली. बक्षीस समभाग मंजुरीच्या तारखेपासून म्हणजे दोन महिन्यांच्या आत म्हणजेच १५ डिसेंबर२०२४ पर्यंत जमा केले जातील. विप्रोच्या भागधारकांना बक्षीस समभाग देण्याची ही तिची १४ वी वेळ आहे. आघाडीच्या ५० कंपन्यांमध्ये सर्वाधिक वेळा बक्षीस समभाग देणारी ती कंपनी ठरली आहे. गेल्या वर्षी एप्रिल २०२३ मध्ये विप्रोच्या संचालक मंडळाने १२,००० कोटी रुपयांच्या समभाग पुनर्खरेदी (बायबॅक) योजनेला मंजुरी दिली होती. याआधी २०१९ मध्ये तीनास एक बक्षीस समभाग दिला होता.