आयटी कंपनी विप्रोचे संस्थापक अझीम प्रेमजी यांनी त्यांच्या शेअर्सचा मोठा भाग त्यांच्या मुलांना गिफ्ट म्हणून दिला आहे. प्रेमजींनी त्यांच्या दोन मुलांना ५०० कोटी रुपयांचे शेअर्स दिले आहेत. त्यांनी स्टॉक एक्स्चेंज फायलिंगमध्ये ही माहिती दिली.
किती शेअर्स वाटून घेतले
नियामक फायलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे की, विप्रोच्या संस्थापकांनी त्यांचे पुत्र ऋषद प्रेमजी आणि तारिक प्रेमजी यांना शेअर्स गिफ्ट म्हणून दिले आहेत. प्रत्येक मुलाला ५१,१५,०९० शेअर्स म्हणजेच ५१ लाख शेअर्स देण्यात आले आहेत. अझीम प्रेमजींनी आपल्या मुलांना भेट दिलेल्या शेअर्सची संख्या विप्रोच्या एकूण भाग भांडवलाच्या ०.०२ टक्के आहे.
अझीम प्रेमजींसाठी किती शेअर्स शिल्लक राहिलेत?
पुत्रांना दिलेल्या भेटीनंतर आता प्रेमजी कुटुंबाकडे सुमारे ४.४ टक्के हिस्सा आहे. त्यापैकी त्यांच्याकडे ४.३ टक्के आणि त्यांची पत्नी यास्मिन प्रेमजी यांच्याकडे ०.०५ टक्के हिस्सा आहे. याशिवाय त्यांच्या दोन्ही मुलांची ०.०३ टक्के हिस्सेदारी आहे. अझीम प्रेमजी यांची दोन मुले विप्रोमध्ये मोठे भागीदार आहेत. ऋषद प्रेमजी यांच्याकडे कंपनीचे अध्यक्षपद आहे. याबरोबरच ते अझीम प्रेमजी फाऊंडेशन आणि अझीम प्रेमजी एंडोमेंट फंडाच्या बोर्डाचे सदस्य आहेत. तारिक प्रेमजी यांच्याकडे अझीम प्रेमजी एंडॉवमेंट फंडामध्ये उपाध्यक्षपद आहे.
कंपनीच्या भागधारकांवर काय परिणाम होणार?
अझीम प्रेमजींनी आपल्या मुलांना एवढा मोठा हिस्सा भेट दिल्यानंतर या मोठ्या व्यवहाराचा कंपनीच्या प्रवर्तक गटावर काही परिणाम होणार का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्यामुळे याचा भागधारकांवर कोणताही परिणाम होणार नसल्याचे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. कारण समभागांचे हस्तांतरण ग्रुपमध्येच झाले आहे.