मुंबई : माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या विप्रोच्या निव्वळ नफ्यात सरलेल्या ऑक्टोबर ते डिसेंबर तिमाहीत २४.४ टक्क्यांनी वाढ होऊन, तो ३,३५४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीचा महसूल मात्र २२,३१९ कोटी रुपयांवर, ०.१ टक्के नगण्य वाढीसह स्थिर राहिला.
या तिमाहीत माहिती-तंत्रज्ञान सेवांमधून मिळणारे उत्पन्न अनुक्रमे १.२ टक्क्यांनी घटून २.६३ अब्ज डॉलर झाले. मात्र डॉलरच्या तुलनेत रुपयातील घसरणीमुळे, तिमाहीगणिक ते ०.१ टक्क्यांनी वाढले. सरलेल्या तिमाहीत विप्रोने एकूण ३.५ अब्ज डॉलरचे कार्यादेश प्राप्त केले. तसेच डिसेंबर तिमाहीत कंपनीची राखीव गंगाजळी ४,९३१ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
हेही वाचा >>> दोन वर्षांत १,००० कंपन्यांची ‘आयपीओ’साठी रीघ; तीन लाख कोटींची निधी उभारणी अपेक्षित
विप्रोने तिमाहीत एकंदर अपेक्षेपेक्षा चांगला नफा मिळवला आहे. कंपनीने कार्यबळातील बदलांसह नवोपक्रमात गुंतवणूक वाढवली आहे. त्याचीच परिणती म्हणजे कंपनीने सरलेल्या तिमाहीमध्ये तीन वर्षांतील सर्वाधिक नफा मिळविला. या तिमाहीत १७ मोठे करार कंपनीने केले आणि एकत्रित करार मूल्य १ अब्ज डॉलरच्या घरात जाणारे आहे. यामध्ये आरोग्य सेवा, वित्तीय सेवा, माध्यमे आणि दूरसंचार यांसारख्या उद्योगांमधील महत्त्वपूर्ण कार्यदेशांचा समावेश आहे, अशी माहिती विप्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीनी पल्लिया म्हणाले.
अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाच्या व्यवसायानुकूल धोरणांमुळे भारतीय माहिती-तंत्रज्ञान कंपन्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. या क्षेत्रातील आघाडीच्या भारतीय कंपन्यांसाठी अमेरिका ही सर्वात मोठा महसूल मिळवून देणारी बाजारपेठ आहे. विप्रोचे मोठे प्रतिस्पर्धी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, इन्फोसिस आणि एचसीएलटेक यांनी या तिमाहीत खर्चात वाढ झाल्याचे अधोरेखित केले.
शुक्रवारच्या सत्रात विप्रोचा समभाग २.१२ टक्क्यांच्या घसरणीसह २८१.९५ रुपयांवर स्थिरावला. सध्याच्या शेअरच्या बाजारभावानुसार, कंपनीचे २,९५,१९७ कोटी रुपयांचे बाजारभांडवल आहे.
कर्मचाऱ्यांची संख्या घटली विप्रोच्या कर्मचाऱ्यांची संख्या तिसऱ्या तिमाहीत १,१५७ ने कमी झाली आहे. डिसेंबर तिमाहीअखेर कंपनीकडे २,३२,७३२ कर्मचारी कार्यरत आहेत. नोकरी सोडून जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दर १५.३ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत नवीन कर्मचाऱ्यांच्या भरतीचा दर १४.५ टक्के होता.