World Bank Praised Indian Economy: बेरोजगारी, महागाई, गरिबी रेषेखाली असणाऱ्या जनतेच्या विकासाचा मुद्दा, मध्यमवर्गासमोरील अगणित आर्थिक अडचणी अशा अनेक मुद्द्यांवर विरोधकांकडून केंद्र सरकारला लक्ष्य केलं जात आहे. या मुद्द्यांना धरून अनेक आंदोलनंही होताना दिसत आहेत. मात्र, एकीकडे ही टीका होत असताना दुसरीकडे जागतिक बँकेकडून भारतीय अर्थव्यवस्थेचं कौतुक करण्यात आलं आहे. सध्याच्या जागतिक पातळीवरील आर्थिक स्थितीचा विचार करता भारतानं जे साध्य केलंय, ते कौतुकास्पद असल्याचा निर्वाळा जागतिक बँकेचे अध्यक्ष अजय बांगा यांनी दिला आहे. बिझनेस स्टँडर्डनं याबाबतचं सविस्तर वृत्त दिलं आहे.
पुढच्या आठवड्यात जागतिक बँक व आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यांची वार्षिक बैठक होणार असून त्या पार्श्वभूमीवर अजय बांगा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीसंदर्भात त्यांनी कौतुकोद्गार काढले. “भारताचा विकासदर ही जागतिक अर्थव्यवस्थेमधली सर्वात उज्ज्वल अशी बाब आहे”, अशा शब्दांत त्यांनी भारताचं कौतुक केलं. शिवाय, या विकासदरामध्ये सर्वाधिक वाटा हा भारताच्या अंतर्गत बाजारपेठेतील उत्पन्नाचा असल्याचंही त्यांनी नमूद केलं.
“भारताचा विकासदर जागतिक अर्थव्यवस्थेत सर्वात उज्ज्वल अशा बाबींपैकी आहे याबाबत शंकाच नाही. मला वाटतं सध्याच्या जागतिक आर्थिक स्थितीमध्येही ६ किंवा ७ टक्क्यांच्या आसपास विकासदर राखणं यातून हेच दिसून येतं की त्यांनी इथपर्यंत येण्यासाठी बऱ्याच गोष्टी केल्या आहेत”, असं अजय बांगा म्हणाले.
अंतर्गत बाजारपेठेचा मोठा हिस्सा!
दरम्यान, भारताच्या अंतर्गत बाजारपेठेतील स्थितीबाबत बांगा यांनी यावेळी सकारात्मक भाष्य केलं. “भारताच्या विकासदरामध्ये सर्वाधिक हिस्सा हा त्यांच्या अंतर्गत बाजारपेठेतल्या उत्पन्नाचा आहे. ही बाब अर्थव्यवस्थेसाठी काही बाबतीत महत्त्वाची आहे. भारताला जर कशावर काम करण्याची गरज असेल, तर ते म्हणजे सर्व लोकांची राहणीमान सुधारणा, चांगल्या दर्जाची हवा-पाणी व इतर बाबी लोकांना उपलब्ध करून देणं. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यासंदर्भात भूमिका मांडली आहे”, असं बांगा यांनी नमूद केलं.
“आम्ही यासंदर्भात भारत सरकारच्या संपर्कात आहोत. अनेक मुद्द्यांवर आम्ही त्यांच्याशी चर्चा करत आहोत, काम करत आहोत. मला वाटतं येत्या काळात यासंदर्भात काही प्रकल्प प्रत्यक्षात उतरलेले पाहायला मिळतील”, असंही बांगा यांनी यावेळी सांगितलं.
विकासाचं रुपांत नोकऱ्या व शाश्वत विकासात!
दरम्यान, जागतिक बँकेच्या व्यवस्थापकीय संचालिका अॅना बजेर्दे यांनी यावेळी भारत सरकारला विकासाचं रुपांतर शाश्वत विकास आणि नोकऱ्यांमध्ये कसं करता येईल, याबाबत जागतिक बँक मदत करत असल्याचं नमूद केलं. त्यांनी यावेळी कामाच्या ठिकाणी महिलांची संख्या वाढवण्याची गरज व्यक्त केली. आर्थिक विकासामध्ये महिला शक्तीचा सहभाग वाढवण्याची खूप मोठी क्षमता भारतात असल्याचंही त्या म्हणाल्या.
याचबरोबर जागतिक बँक भारतातील शहरांच्या विकासाच्या दृष्टीनेही केंद्र सरकारबरोबर चर्चा करत असल्याचं त्यांनी सांगितलं. विशेषत: शहरांमधील हवेची गुणवत्ता, पाणीपुरवठा किवा शहर नियोजनाच्या बाबतीत काम करून शहरांचा दर्जा अधिक सुधारण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.