मुंबई : तरूणाईचा म्युच्युअल फंडांपेक्षा थेट भांडवली बाजारात अर्थात समभागांमध्ये गुंतवणूक करण्याकडे अधिकाधिक कल असल्याचे सोमवारी प्रसिद्ध झालेल्या ‘फिन वन’च्या अहवालातून समोर आले. उल्लेखनीय म्हणजे ९३ टक्के तरुण बचत करीत असून, त्यापैकी बहुतांश २० ते ३० टक्के मासिक बचत आणि गुंतवणूक करीत आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आघाडीची दलाली पेढी असलेल्या ‘एंजल वन’ने प्रस्तुत केलेला डिजिटल मंच ‘फिन वन’ने देशातील १३ शहरांतील १,६०० कमावत्या तरुणांच्या सर्वेक्षणावर आधारीत हा अहवाल तयार केला आहे. अहवालानुसार, सध्या तरुण भारतीय गुंतवणूकदारांपैकी ५८ टक्के भांडवली बाजारात गुंतवणूक करीत आहेत. याचवेळी म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण ३९ टक्के आहे. भांडवली बाजारात गुंतवणूक करण्यास तरुणांची सर्वाधिक पसंती मिळत आहे. मुदत ठेवी अथवा सोने या गुंतवणुकीच्या पारंपरिक पर्यायांऐवजी ४५ टक्क्यांनी त्यांचे प्राधान्य भांडवली बाजाराला असल्याचे म्हटले आहे. मुदत ठेव आणि आवर्ती ठेव यासारख्या गुंतवणुकीच्या सुरक्षित पर्यायांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या तरूणांचे प्रमाण तुलनेने कमी असून, ते अनुक्रमे २२ व २६ टक्के आहे. जास्त परतावा आणि स्थिर बचत असा संतुलित मार्ग तरुणांकडून निवडला जात आहे.

हेही वाचा >>> इक्विटी म्युच्युअल फंडात ऑक्टोबरमध्ये विक्रमी ४१,८८७ कोटींचा ओघ

तरुणांमधील बचतीचे प्रकार, गुंतवणूक प्राधान्य, वित्तीय साक्षरता आणि वित्तीय साधने व तंत्रज्ञानाचा वापर हे सर्वेक्षणाचे प्रमुख चार निकष होते. यात ६८ टक्के तरुणांनी आपोआप बचतीची सवय लावणाऱ्या तंत्रज्ञानाधारीत साधनांचा ते वापर करीत असल्याचे म्हटले आहे. त्यातून ‘फिनटेक’कडून उपलब्ध डिजिटल मंच आणि तंत्रज्ञानाचा वाढलेला वापर अधोरेखित झाला आहे. वित्तीय तंत्रज्ञानाचा भारतीय तरुणांवर वाढलेला प्रभावही या अहवालात स्पष्ट झाला आहे.

वाढता जीवनमान खर्च वाटेकरी

तरुणांकडून शिस्तबद्धरित्या बचत केली जात असली तरी जीवनमानाचा वाढलेला खर्च बचतीत अडसर ठरत आहे, अशी मनोभूमिकाही बहुतांश म्हणजेच ८५ टक्के तरुणांनी सर्वेक्षणांत मांडली. यात खानपान, दैनंदिन वापराच्या वस्तू आणि वाहतूक या गोष्टी आणि यातील वाढती महागाईमुळे त्यावरील खर्च वाढत आहे. खर्चात या घटकांच्या वाढत्या वाट्याने बचतीवर ताण येत असल्याचे तरुणांचे म्हणणे आहे. भारतीय तरुणांसमोर वाढता जीवनमान खर्च हे मोठे आव्हान असल्याचे अहवालाने निष्कर्षाप्रत नमूद केले आहे.

मराठीतील सर्व अर्थवृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Young adults prefer to invest in stocks directly rather than mfs report by fin one print eco news zws