वृत्तसंस्था, नवी दिल्ली
झी एंटरटेन्मेंट एंटरप्रायझेसने इंडसइंड बँकेकडे असलेली थकीत देणी परत करण्याची तयारी दर्शवली आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत इंडसइंड बँकेकडूनदेखील दिवाळखोरीची प्रक्रिया थांबवली जाण्याची शक्यता आहे. झीचे सोनीमध्ये प्रस्तावित विलीनीकरण मार्गी लावण्याच्या दृष्टीने हे पाऊल टाकण्यात आल्याचे बोलले जाते.
गेल्या महिन्यात राष्ट्रीय कंपनी विधि न्यायाधिकरण अर्थात ‘एनसीएलटी’ने ‘झी’विरुद्ध दिवाळखोरीच्या कारवाईसाठी इंडसइंड बँकेची याचिका मान्य केली होती. झीचे सोनीमध्ये विलीनीकरण अंतिम टप्प्यात आले असताना इंडसइंड बँकेची ही याचिका मान्य करण्यात आल्याने माध्यम आणि मनोरंजन क्षेत्रातील सर्वात मोठ्या व्यवहाराच्या पूर्ततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. तथापि राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय न्यायाधिकरण अर्थात एनसीएलएटीने मात्र दिवाळखोरीच्या प्रक्रियेला स्थगितीचा आदेश दिला होता.
झी एंटरटेनमेंटचा समभाग तेजीत
गुरुवारच्या सत्रात मुंबई शेअर बाजारात झी एंटरटेनमेंट एंटरप्रायझेसचा समभाग ९.२६ टक्क्यांनी वधारला. दिवसअखेर तो १७.५० रुपयांनी वधारून २०६.५५ रुपयांवर बंद झाला. तर दुसरीकडे इंडसइंड बँकेचा समभाग २.३१ टक्क्यांच्या घसरणीसह १,०२०.१५ रुपयांवर बंद झाला.