Aakriti Chopra Resings Zomato : झोमॅटोचे सह-संस्थापक आणि मुख्य लोक अधिकारी आकृती चोप्रा यांनी फूड डिलिव्हरी क्षेत्रातील १३ वर्षांच्या दीर्घ कार्यकाळानंतर तात्काळ प्रभावाने राजीनामा दिला आहे, अशी माहिती कंपनीने २७ सप्टेंबर रोजी स्टॉक एक्सचेंजला दिली.
“आज, २७ सप्टेंबर २०२४ पासून औपचारिकपणे माझा राजीनामा पाठवत आहे. गेल्या १३ वर्षांतील हा एक अविश्वसनीय समृद्ध करणारा प्रवास आहे. सर्व गोष्टींसाठी धन्यवाद. “, असं चोप्रा यांनी मेलमध्ये लिहिले आहे. चोप्रा या ब्लिंकिटचे सीईओ अलबिंदर धिंडसा यांच्या पत्नी आहेत. आकृती चोप्रा या २०११ मध्ये झोमॅटोमध्ये रुजू झाल्या होत्या. सुरुवातीला त्या सीनिअर मॅनेजर म्हणून रुजू झाल्या होत्या. त्यानंतर त्यांनी झपाट्याने प्रगती केली. २०१२ मध्ये त्या व्हीपी (फायनान्स आणि ऑपरेशन्स) बनल्या. तर, २०२० मध्ये सीएफओ पद स्वीकारलं. तर २०२१ मध्ये त्यांची बढती होऊन सहसंस्थापक झाल्या.
१९८८ साली आकृती यांचा जन्म झाला. त्या मूळच्या गुरुग्रामच्या असून डीपीएस, आरके पुरम येथून त्यांनी शिक्षण घेतलं आहे. झोमॅटोमध्ये येण्यापूर्वी त्या पीडबल्यूमध्ये तीन वर्षे काम केलं आहे. आकृती यांना विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे. २०१७ मध्ये फोर्ब्स इंडियाच्या ३० अंडर ३० यादीत त्यांचा समावेश होता. तर, २०१८ मध्ये वुमन ऑफ दि इयर पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
हेही वाचा >> ‘सेबी’कडून ह्युंदाई आणि स्विगीच्या महाकाय आयपीओंना मंजुरी; दोन्ही कंपन्यांकडून ३५,००० कोटींची निधी उभारणी अपेक्षित
गेल्या काही दिवसांत झोमॅटोच्या अनेक वरिष्ठ स्तरीय अधिकाऱ्यांनी राजीनामे दिले आहेत. त्यातच चोप्रा यांनी राजीनामा दिला. सह-संस्थापक मोहित गुप्ता यांनी कंपनी सोडल्यानंतर जानेवारी २०२३ मध्ये सीटीओ गुंजन पाटीदार यांनी राजीनामा दिला होता . त्याच वेळी, झोमॅटोचे नवीन उपक्रम प्रमुख आणि माजी अन्न वितरण प्रमुख राहुल गंजू आणि इंटरसिटी लीजेंड्स सेवेचे प्रमुख सिद्धार्थ झंवर यांनीही राजीनामा दिला होता. मात्र, व्यवसाय वृद्धीसाठी राहुल गंजू आणि प्रद्योत घाटे यांना झोमॅटोमध्ये परत आणले आहे.
दोन वर्षांत पाच जणांनी सोडली कंपनी
गेल्या दोन वर्षांत राजीनामा देणाऱ्या चोप्रा या पाचव्या अधिकारी आहेत. पाटीदार, पंकजा चढ्ढा, गौरव गुप्ता, मोहित गुप्ता यांनीही राजीनामा दिला होता. चढ्ढा यांनी २०१८ मध्ये तर गौरव गुप्ता यांनी २०२१ मध्ये राजीनामा दिला होता.