नवी दिल्ली : ऑनलाइन अन्नपदार्थ वितरण मंच असलेल्या स्विगी आणि झोमॅटो या कंपन्यांची स्पर्धाविरोधी व अनिष्ट व्यवसाय पद्धतींचा अवलंब केल्याप्रकरणी भारतीय स्पर्धा आयोगाकडून (सीसीआय) चौकशी सुरू आहे. मात्र सोमवारी दोन्ही कंपन्यांनी या प्रकरणी नियमंभंग झाल्याचा आरोप फेटाळून लावले आहेत.
भारतीय स्पर्धा आयोगाच्या चौकशीतून कठोर कारवाईच्या निष्कर्षाच्या वृत्ताला स्विगी आणि झोमॅटो या दोहोंनी दिशाभूल करणारे असल्याचे म्हटले आहे. अनिष्ट व्यवसाय पद्धतीप्रकरणी सुरू असलेल्या चौकशीवर अद्याप आयोगाने अंतिम आदेश दिलेला नाही. स्विगी आणि झोमॅटोकडून काही सहभागी रेस्टॉरन्ट्सना प्राधान्य दिले जाते, असा आरोप करण्यात आला होता. याबाबत झोमॅटोने म्हटले आहे की, आयोगाने प्रथमदर्शनी आदेश ४ एप्रिल २०२२ रोजी दिला होता. त्यात स्पर्धा कायदा २००२ नुसार चौकशी करून नियमभंगाची तपासणी करण्याचे निर्देश आयोगाच्या महासंचालक कार्यालयाला देण्यात आले होते. त्यानंतर अद्याप या प्रकरणी अंतिम आदेश देण्यात आलेला नाही.
हेही वाचा >>> सर्वोच्च न्यायालयाचा मुकेश अंबानींना दिलासा; ‘आरपीएल शेअर्स’प्रकरणी ‘सॅट’च्या आदेशाला सेबीचे आव्हान फेटाळले!
स्विगीने म्हटले आहे की, सध्याच्या चौकशी प्रक्रियेबाबत गोंधळ निर्माण करणारे हे वृत्त देण्यात आले आहे. या प्रकरणी चौकशी करून आयोगाच्या महासंचालकांनी यावर्षी मार्चमध्ये अहवाल सादर केला होता. या प्रकरणी अद्याप आयोगाने अंतिम निर्णय घेतलेला नाही. आयोगाकडून कंपनीला कोणतेही तपशील मिळालेले नाहीत. आयोगाकडून काही निर्देश आल्यास त्याला कंपनी उत्तर देईल. त्यानंतर आयोग सुनावणी घेऊन अंतिम आदेश देईल.
दोन्ही कंपन्या दोषी? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्विगी आणि झोमॅटो या परस्परांच्या स्पर्धक असलेल्या कंपन्या ‘सीसीआय’ने सुरू केलेल्या चौकशीत दोषी आढळल्या आहेत, असा हाती लागलेल्या माहितीच्या आधारे सूत्रांचा दावा आहे. दोहोंकडून अयोग्य व्यवसाय पद्धतींचा अवलंब केला जात आहे. याचबरोबर ठराविक रेस्टॉरन्ट्सना प्राधान्यक्रम दिला जात असल्याचे चौकशीत समोर आले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
© The Indian Express (P) Ltd