मुंबई : दृकश्राव्य संपर्क सेवा देणाऱ्या आघाडीच्या झूम इंडियाने पुण्यातून झूम फोन सेवेला सुरुवात केली आहे. महाराष्ट्रातून (पुणे) सुरू होणारी ही सेवा विद्यमान फोन क्रमांकाच्या साहाय्यानेदेखील कार्यान्वित करता येणार आहे. येत्या काही महिन्यांत ही सेवा कर्नाटक, तमिळनाडू, आंध्र प्रदेश, मुंबई आणि दिल्लीसह इतर दूरसंचार मंडळांमध्ये विस्तारली जाईल, असे झूमने गुरुवारी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

हेही वाचा >>> Stock Market Crash : आखातातील युद्धाचे सावट; ‘सेन्सेक्स’ची १,७७० अंशांनी घसरण

झूम इंडियाला गेल्या वर्षी एप्रिलमध्ये भारतात झूम फोन सेवा कार्यान्वित करण्यासाठी परवाना प्राप्त झाला होता. स्थानिक कंपन्यांच्या फोन नंबरच्या आधारावर महाराष्ट्र दूरसंचार परिमंडळ (पुणे), बंगळूरु, चेन्नई, हैदराबाद, मुंबई आणि दिल्ली येथे झूम फोन सेवा उपलब्ध केली जाणार आहे.

झूम फोनच्या माध्यमातून अनेकांना कामाच्या ठिकाणी संपर्क साधण्यासाठी मंच उपलब्ध होणार असून एआय अर्थात कृत्रिम प्रज्ञेने समर्थ तंत्रज्ञान वापरण्यास हा मंच सक्षम करेल. सध्याचे झूमचे सशुल्क ग्राहकदेखील याचा वापर करू शकतील. पब्लिक स्विच्ड टेलिफोन नेटवर्कद्वारे ‘इनबाउंड’ आणि ‘आउटबाउंड’ कॉलिंगसाठीदेखील याचा वापर करता येईल, असे झूमचे भारत आणि सार्क देशातील प्रमुख आणि सरव्यवस्थापक समीर राजे यांनी सांगितले. दृकश्राव्य संपर्काचे भविष्य घडविण्यात झूमचा महत्त्वपूर्ण वाटा राहिला आहे. करोनाकाळात कर्मचाऱ्यांकडून ‘वर्क फ्रॉम होम’ सुरू असताना, झूमच्या माध्यमातून महत्त्वाच्या बैठका दूरस्थपणे उरकून अनेक कंपन्यांनी कामकाज सुरू ठेवले होते.