दीपक प्रधान

गुंतवणुकीविषयी अनेक जाणकारांकडून उपयुक्त माहिती सातत्याने मिळत असते, परंतु ढीगभर माहिती गोळा झाली तरी आपण नक्की कोणाचे ऐकायचे आणि प्रत्यक्षात काय आणि कसे करायचं हा प्रश्न सर्वसामान्यांपुढे राहतो. मग अशा वेळी कोणीतरी लिहिलेले / सांगितलेले गुंतवणुकीचे पर्याय फारच आकर्षक वाटले, तर आपण आपल्यापरीने त्यात अधूनमधून काही गुंतवणूक करतो. अशी गुंतवणूक पूर्वनियोजित नसते, आणि अपेक्षित फायदा न झाल्यास ती तशीच पडून राहते.

Honda Nissan merger
होंडा, निस्सानचे ऐतिहासिक महाविलीनीकरण; ऑगस्ट २०२६ पर्यंत तडीस नेण्याचा निर्धार
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Kumbh Mela Nashik , Nashik Guardian Minister,
सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे पालकमंत्रिपदाला महत्व, महायुतीत शह-काटशहाचे राजकारण
Maharashtra State Cabinet Expansion Satara district gets maximum ministerial posts
मराठ्यांना प्राधान्य… सातारा जिल्ह्यास सर्वाधिक मंत्रिपदे… मुंबई, नाशिकची बोळवण… मंत्रिमंडळ विस्ताराला नाराजीची किनार?
Why has fish production in Konkan decreased this year print exp
पाच वर्षांतला नीचांक… कोकणातील मत्स्य उत्पादन यंदा का घटले? निसर्गाइतकाच मानवही जबाबदार?
us dollar strength us dollar is likely to stay stronger for longer and market future
 बाजार रंग : डॉलरची दादागिरी आणि बाजाराचे भविष्य
Satara MLA Shivendra Raje Bhosale
Maharashtra Cabinet Expansion : “…पण, आतापर्यंत फोन आला नाही”, मंत्रिमंडळ विस्ताराबाबत शिवेंद्रराजेंनी काय सांगितले?
foreign direct investment
विश्लेषण : थेट विदेशी गुंतवणुकीचे उच्चांकी शिखर; जगाला भारताचे आकर्षण कशामुळे?

खरं तर असा कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी, आतापर्यंतची गुंतवणूक किती आहे आणि ती कशा प्रकारे गुंतवलेली आहे याचा विचार करणं गरजेचं असतं. इतकंच नाही तर आपण यापुढील काळात ज्या गुंतवणुकीचं स्वतःवर बंधन घालून घेतलं आहे (उदाहरणार्थ, आयुर्विम्याचे हप्ते, आरोग्य विम्याचे हप्ते, घराच्या कर्जाचे हप्ते, म्युच्युअल फंडातील ‘एसआयपी’ वगैरे ) यांचाही विचार करणं गरजेचं असतं.

आपल्या सध्याच्या आर्थिक स्थितीचा, भविष्यातल्या गरजांचा आणि जोखीम स्वीकारण्याच्या तयारीचा सर्वांगीण विचार केल्याशिवाय आपण गुंतवणुकीचा कुठलाही निर्णय घेणं योग्य नाही. याउलट बाजू म्हणजे, जोखीम या शब्दाचा आपल्या मनातला अर्थ सद्य:स्थितीत सयुक्तिक आहे का, याचाही विचार केला गेला पाहिजे. बऱ्याच वेळा याविषयी असलेल्या गैरसमजांमुळे चांगल्या संधीचा फायदा घेतला जात नाही.
गुंतवणूक हा आपल्या आर्थिक नियोजनाचा एक भाग आहे आणि नियोजन करण्यामध्ये आपण कोणती दक्षता बाळगली पाहिजे याविषयी सल्ला देण्याच्या निमित्ताने अनेक व्यक्तींशी केलेल्या संवादातून जे निरीक्षणास आले, त्याची मांडणी या लेखात आहे. विशेषतः सर्व वर्गातल्या मराठी माणसांच्या बाबतीत या गोष्टी आढळून येतात. अर्थातच यातील प्रत्येक गोष्ट सर्वांना लागू होईल असेही नाही.

१. कुठेतरी, कधीतरी पैसे गुंतवणे म्हणजे नियोजन नाही. सर्वसाधारणतः गुंतवणुकीतून आपल्या आर्थिक भविष्याला दिशा देता येऊ शकते आणि कायमच्या अनामिक संभ्रमात राहण्यापासून मुक्त होता येऊ शकते याची अनेकांना कल्पना नसते.
२. आपल्या आर्थिक परिस्थितीबद्दल आपण मोकळ्या मनाने एखाद्या जाणकाराशी चर्चा केली तर आपल्या मनातले गुंते सुटू शकतात. तरी असा सल्ला कोणी निरपेक्षपणे देईल याची खात्री नसते. कोणाचे तरी ऐकून, आपले यापूर्वी कसे नुकसान झाले याचे निदान एखादे तरी उदाहरण मनात घर करून असते व भीती घालत असते.
३. उगाच जास्त पैशाच्या मागे लागण्यापेक्षा सुरक्षित ठिकाणी बँकेत किंवा मोठ्या कंपनीच्या योजनेत पैसे ठेवलेले बरे, असा एक मतप्रवाह असतो. योग्य प्रकारे गुंतवणूक करून धनसंचय वाढवणे म्हणजे पैशाच्या मागे लागणे नव्हे. यातून फारशी जोखीम न घेता, मर्यादित अपेक्षेपेक्षा पुष्कळ जास्त फायदा होऊ शकतो.
४. शेअर बाजार ही पैसे बुडवण्याची व्यवस्था आहे असे लहानपणापासून ऐकलेले असते. हा सट्टा असून ते आपल्यासारख्याचे काम नाही याची जवळजवळ खात्री असते. कोणाचे तरी ऐकून आपण कसे नुकसानीत गेलो याचे प्रत्येकाकडे किस्से असतात.
५. डिमॅट खाते ही एक मोठीच भानगड वाटते. ते कुठे उघडायचे आणि कसे चालवायचे याची माहिती नसणे चूक नाही. पण ती आजच्या काळातली आवश्यकता झाली आहे आणि त्या संबंधाने माहिती जाणून घेण्याची मानसिकता असणे गरजेचे आहे. काहींच्या बाबतीत, डिमॅट खाते असलेच तर त्यामध्ये कोणीतरी टीप दिली म्हणून, किंवा टीव्हीवर ऐकले म्हणून, कधीतरी घेतलेले काही शेअर्स असतात. त्यामध्ये अपेक्षित यश न मिळाल्यास आपण पुन्हा त्या वाटेला जाऊ नये अशी धारणा होते.
६. आपण घेतले की त्या शेअरचा भाव लगेच पडतो असा सार्वत्रिक अनुभव असतो. त्यासाठी जाणकारांकडून माहिती घ्यावी आणि दीर्घकाळ थांबण्याचा संयम ठेवावा याची कल्पना नसते. बऱ्याच वेळा, थोड्या दिवसांत भरपूर फायदा मिळणार किंवा काही वर्षांत अनेक पटीने फायदा मिळणार असण्याच्या कल्पनेने असे शेअर्स घेतलेले असतात.
७. जवळच्या नात्यातल्याने किंवा मित्राने एजन्सी घेतली म्हणून म्युच्युअल फंडामध्ये अचानक गुंतवणूक केली जाते. त्यानंतर त्यांची आज काय परिस्थिती आहे याची माहिती नसते. भीड पडल्यानेसुद्धा गुंतवणूक होते. मग त्यानंतर त्या विषयी कसा निर्णय घ्यायचा हे कळेनासे होते.
८. सर्व प्रकारच्या विम्याची हीच गोष्ट असते. भीड पडली म्हणून किंवा तात्कालिक कारणाने पटले म्हणून विम्याचा अर्ज भरून दिला जातो आणि आयुष्यभर त्याचा हप्ता भरण्याची सक्ती झाली हे नंतर कळते. तर काहींसाठी अशा योजनेत हप्ते भरत राहण्याने आपण चांगली गुंतवणूक करत आहोत असा गैरसमज आणि आत्मविश्वास निर्माण होतो.
विमा ही गुंतवणूक नसून तो एक आपत्कालीन पर्याय आहे हे सहसा लक्षात आलेले नसते. आणि या विषयात योग्य पर्याय असूनही त्याची माहिती आणि विचार होत नाही.

९. ‘दुसरे घर’ हा एक नवा भूलभूलैया आहे. अनेक मध्यमवर्गीय यामध्ये गुंतवणूक करताना दिसतात. या विषयात भावनेच्या आहारी जाण्याऐवजी आपण घेतलेली ही ‘मालमत्ता’ आहे का आपण स्वतःसाठी एक ‘देणं’ निर्माण केलं आहे, हे पाहिले पाहिजे. या गुंतवणुकीवर परतावा तर नाहीच, परंतु खर्च नक्कीच आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये अडकवलेल्या रकमेऐवजी, तेवढीच रक्कम आर्थिक मालमत्तेत गुंतवली तर त्यातून किती वृद्धी होऊ शकेल, याचा विचार व्हायला हवा.

दुसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा दुसऱ्या घरामध्ये गुंतवलेला निधी, ती मालमत्ता विकल्याशिवाय हातात येणे शक्य नाही. याउलट, आर्थिक मालमत्ता असली म्हणजे त्यातून आपल्याला गरज असेल तेवढाच पैसा कधीही काढून वापरता येतो आणि उरलेला तसाच वृद्धिंगत होत राहू शकतो. आपली आर्थिक सुबत्ता एका विशिष्ट पातळीच्या वर गेल्यानंतर दुसरे घर घेण्यात हरकत नसावी.

१०. काही कुटुंबांमध्ये असेही दिसते की त्यांच्याकडे भरपूर धनसंचय आहे आणि बँकेत सर्व रक्कम ठेवून फक्त पाच टक्क्यांनी व्याज मिळाले तरी त्यांना भविष्याची कुठलीही चिंता नसावी. महागाईच्या दरापेक्षा व्याजदर जर कमी असेल तर आपले ठेवलेले पैसेही आपल्याला पूर्णपणे परत मिळत नाहीत या विषयाची त्यांना जाणीव किंवा चिंता नसते.
११. काहींना दरमहा सोने विकत घेऊन वर्षानुवर्षे ते साठवत राहण्याची आवड असते. कितीही सोने साठले तरी ते सहसा विकले जात नाही. खरे तर सुरक्षितता म्हणून अत्यल्प प्रमाणामध्ये सोने घेण्यास काहीच हरकत नसावी, पण तेही प्रत्यक्ष सोनाराकडून न घेता कागदी स्वरूपात घेता येते.
१२. आपल्याला फार फायदा झाला तर प्राप्तिकर भरावा लागेल, अशी काळजीसुद्धा असते. म्हणजे फायदा झाला नाही तरी चालेल पण कर उगाच कशाला भरायचा हा प्रश्न पडलेला असतो.
१३. पुढच्या १०, १५, २०, २५ वर्षांनी आपली आर्थिक परिस्थिती कशी असावी आणि त्याची जमेल तेवढी तजवीज आतापासून केली पाहिजे आणि तसे करता येईल हा विचार असला पाहिजे.
१४. इंटरनेट आणि ऑनलाइन व्यवहारांची भीती हेही एक कारण असते.
१५. आपल्यापश्चात नावावर असलेल्या विविध प्रकारच्या गुंतवणुकीचे काय व्हायला हवे याचा ठोस विचार अत्यंत गरजेचा आहे. इतकेच नाही तर तो विचार इच्छापत्राच्या रूपाने लिहून ठेवण्याची अतिशय गरज आहे. तसे न केल्यास आपल्या वारसदारांना अनंत अडचणींना सामोरे जावे लागते. कोर्टामधून मिळणाऱ्या वारसाहक्काचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी किती काळ लागेल आणि किती खेटे घालावे लागतील याचा काहीही सुमार नाही. इच्छापत्र लिहिण्याची वेळ अजून आली नाही, अशीही धारणा असते.
१६. आपली गुंतवणूक अनेक प्रकारच्या माध्यमातून केली असली तर त्याचे संपूर्ण कागदपत्र एका ठिकाणी असल्याशिवाय आणि ते आपल्या वारसदारांना माहीत असल्याशिवाय त्याचा ताळमेळ आपल्या पश्चात लागणे फार कठीण होऊन जाते. निदान ते कुठेतरी एकाच ठिकाणी लिहून ठेवलेले असण्याची गरज आहे.
१७. सर्व ठिकाणी आपण वारसदारांचे ‘नॉमिनेशन’ केलेले आहे हे पाहायला हवे. म्हणजे मालमत्तांचा निदान ताबा नॉमिनीला विनासायास मिळेल. नामनिर्देशन केलेली व्यक्ती (नॉमिनी) आणि इच्छापत्रातील वारसदार एकच असला पाहिजे असा कायदा नाही.
यासारख्या अजूनही काही गोष्टी सांगता येतील, परंतु यातल्या प्रत्येक मुद्द्यावर योग्य सल्ला घेऊन आपल्याला अधिक फलदायी, स्थैर्यदायी आणि नियोजनबद्ध पाऊल टाकता येऊ शकते. मात्र या दिशेने पाऊल टाकण्यात, बऱ्याचदा पुढे सांगितलेल्या विचारांमुळे अडचण निर्माण होते.

१. गुंतवणूक आणि नियोजन वगैरे करण्याइतके माझ्याकडे पैसे नाहीत.
२. माझे जे चालले आहे ते बरे आहे. त्यात विनाकारण ढवळाढवळ करून गुंतागुंत करण्याची गरज नाही.
३. नशिबाने माझ्याकडे सर्व काही आहे ते सर्व दुसऱ्याला सांगणे योग्य आहे का? किंबहुना त्यात धोकाच संभवतो.
४. आपल्या अपुऱ्या ज्ञानामुळे किंवा आपल्याकडे असलेल्या मर्यादित आर्थिक क्षमतेमुळे आपले हसे होण्याची शक्यता आहे.
५. सल्ला देणारा माणूस स्वतःच्या फायद्याचीच गोष्ट सांगणार!
६. अशा सल्ल्याची किती फी घेतील याचा अंदाज नाही.
७. सर्वात महत्त्वाचा विचार म्हणजे ‘उगाच कशाला?’
वरील बाबींवर विचार करून, आपलं वय, उत्पन्न, खर्च, आर्थिक बंधन / हप्ते, जबाबदाऱ्या अशा सर्व गोष्टींचा सांगोपांग विचार करून सल्ला देणाऱ्या एखाद्या जाणकाराला अवश्य भेटावे. स्पष्टपणे दिसणाऱ्या अनेक संधींचा फायदा घेऊन आपले आर्थिक भविष्य शक्य तेवढे नियोजित करावे आणि चिंतामुक्त जगावे, हाच या लेखाचा उद्देश आहे.

dpradhan.9@gmail.com

Story img Loader