मुंबई : बहुतांश गुंतवणूकदार ज्यांना शेअर बाजाराची संपूर्ण माहिती नसते त्यांना योग्य संधी आल्यावर गुंतवणुकीची सुरुवात कशी करावी असा प्रश्न पडतो. लोक सामान्यतः समभागांकडे आकर्षित होतात, कारण यात दीर्घ कालावधीत मिळणारा परतावा हा इतका सरस असतो की महागाईमुळे खिशाला बसणारे फटकाऱ्यांची फिकीर राहत नाही. आपली सर्व उद्दिष्टे साध्य करण्यासाठी म्युच्युअल फंडांद्वारे असो किंवा थेट समभागांद्वारे किंवा दोन्हींमध्ये एकत्रितपणे पैसा गुंतवून बाजारात उतरावे, अशी अनेकांची धारणा असते.
पण नव्याने सुरुवात करीत असाल, तर गुंतवणुकीसाठी योग्य कंपनी निवडणे अवघडच ठरते. या निवडीसाठी कंपनीची आर्थिक स्थिती, तिच्या व्यवसायातून वाढीच्या शक्यता, मूल्यांकन, ती कार्यरत असलेल्या उद्योगातील गतिशीलता, बाजाराची स्थिती याबद्दल माहिती असणे आवश्यक असते. अशा वेळी ईटीएफ अर्थात एक्सचेंज ट्रेडेड फंड, विशेषत: निफ्टी ५० निर्देशांकावर आधारीत ईटीएफ उपयुक्त पर्याय ठरतो. म्युच्युअल फंडद्वारे प्रस्तुत केल्या जाणाऱ्या आणि निर्देशांकाचा मागोवा घेणाऱ्या ‘ईटीएफ’च्या युनिट्सचे बाजारात समभागांप्रमाणे व्यवहार होत असतात. बाजाराच्या कालावधीत ईटीएफचे युनिट खरेदी वा विकले जाऊ शकतात. शेअर बाजाराच्या व्यवहारांची ओळख करून घेण्यासाठी नवख्या गुंतवणूकदारांसाठी सर्वसाधारणपणे निफ्टी ५० ईटीएफ हा म्हणून एक प्रारंभिक बिंदू मानला जातो.
नवख्या गुंतवणूकदारांना सुरुवात ही अगदी कमी रकमेपासून करावयाची असते. ईटीएफच्या एका युनिटची खरेदी शंभर रुपयांपासून पुढे करता येऊ शकते. उदाहरणार्थ आयसीआयसीआय प्रुडेन्शियल निफ्टी ५० ईटीएफ ‘एनएसई’वर १८५ रुपयांच्या आसपास व्यवहार करत आहे. अशा प्रकारे ५००-१००० रुपयांची गुंतवणूक निफ्टी ५० ईटीएफचे युनिट खरेदी करता येतील. दर महिन्याला पद्धतशीर गुंतवणूक ‘एसआयपी’देखील करता येईल.
वैविध्यतेने जोखमीत घट : निफ्टी ५० निर्देशांकात बाजार भांडवलाच्या दृष्टीने सर्वात मोठ्या भारतीय कंपन्यांचा समावेश आहे. निर्देशांकाच्या वाटचालीचे अनुसरण करीत असल्याने निफ्टी ५० ईटीएफमध्ये गुंतवणूक केल्याने गुंतवणूकदारांना समभाग आणि उद्योग क्षेत्रवार उत्कृष्ट वैविध्य मिळते. वैविध्यपूर्ण पोर्टफोलिओ गुंतवणूकदारासाठी जोखीम कमी करतो. कारण येथे बाजारातील अस्थिरता ही कोणत्याही एकाच समभागाच्या किमतीवर जास्त विपरित परिणाम करू शकते, कंपन्यांच्या समभागांच्या सबंध गुच्छावरील परिणाम तुलनेने सौम्य असेल.
कमी किंमतीत गुंतवणुकीची सुविधा : निफ्टी ५० ईटीएफमध्ये गुंतवणूक करणे तुलनेने स्वस्त आहे. ईटीएफ निफ्टी ५० हे निर्देशांकाच्या परतावा कामगिरीचा माग घेणारे निष्क्रियपणे व्यवस्थापित गुंतवणूक साधन आहे. निर्देशांकात सामील घटकांमध्ये होणारे मंथन अत्यल्प असल्याने फंड व्यवस्थापन खर्चही कमी असतो. परिणामी खर्चाचे प्रमाण किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे तर फंडाचे शुल्क हे हजारामागे २ ते ५ रुपये (०.०२% – ०.०५%) इतकेच असते.
निफ्टी निर्देशांकात सामील ५० समभागांमध्ये प्रत्येकी काही पैसा गुंतवायचे झाल्यास, खूप मोठी रक्कम लागू शकेल. त्या तुलनेत निफ्टी ५० ईटीएफ तशाच प्रकारच्या गुंतवणुकीचा लाभ ५०० रुपयांच्या गुंतवणुकीने मिळविता येईल.
उत्तम प्रारंभ बिंदू : निफ्टी ५० ईटीएफमध्ये गुंतवणूक करून जास्त जोखीम न घेता, बाजार-गतिमानता आणि त्यातील बारकाव्यांना समजून घेता येऊ शकते. जेव्हा तुम्ही बाजाराला चालना देणाऱ्या विविध घटकांशी परिचित होता येते. त्यानंतर पुढे जोखीम घेण्याची क्षमता, लक्ष्य, कालावधी आणि गुंतवणूक करण्यायोग्य अधिशेष यांच्या आधारावर स्मॉल आणि मिडकॅप समभाग किंवा सुयोग्य म्युच्युअल फंड शोधून गुंतवणुकीचा प्रवास अधिक सूज्ञतेने करणे शक्य बनते. अशा प्रकारे गुंतवणूकदार म्हणून सुरुवातीची ही पावले निर्धोक आणि खात्रीपूर्वक पडणे अतीव महत्त्वाचेच असते आणि याकामी ‘निफ्टी ५० ईटीएफ’ ही पहिली गुंतवणूक उपयुक्त ठरू शकते.