सुधीर जोशी
सरलेल्या सप्ताहात मंगळवारच्या सुट्टीमुळे चारच दिवस झालेल्या व्यवहारात गुंतवणूकदारांचा नफावसुलीवर अधिक भर होता. ब्रिटानिया, पी आय इंडस्ट्रीज, स्टेट बँक आदी कंपन्यांनी तिमाहीत चांगली कामगिरी बजावल्यामुळे समभागातील अकस्मात वाढीने नफावसुलीची संधी मिळाली तर डिव्हीज लॅब, बाटा, व्होल्टास, गोदरेज कन्झ्युमर अशा कंपन्यांनी निराशा केल्यामुळे गुंतवणूकदारांनी त्यामधील गुंतवणूक कमी करण्याकडे लक्ष दिले. अमेरिकेतील चलनवाढीचा दर कमी झाल्याच्या परिणामी जागतिक बाजारात आलेल्या तेजीमुळे सप्ताहातील व्यवहारांना कलाटणी मिळाली. शुक्रवारच्या सत्रात त्याचे पडसाद देशांतर्गत भांडवली बाजारावर उमटत प्रमुख निर्देशांकांनी ५२ आठवड्यातील उच्चांकी पातळी गाठली.
स्टेट बँक
भारतातील सर्वात मोठ्या बँकेच्या दुसऱ्या तिमाहीतील निकालाने सर्वांनाच अचंबित केले. बँकेचा नफा ७४ टक्क्यांनी वधारून १३ हजार कोटी रुपयांवर पोहोचला. गुंतवणुकीवरील उत्पन्नातील वाढ आणि कुठलाही अनपेक्षित तोटा वर्ग करावा न लागल्यामुळे नफ्याने विक्रमी उच्चांक गाठला. गेली काही वर्षे कर्ज बुडविणारे मोठे उद्योग ओळखून त्यांच्या वसुलीची पावले उचलणे आणि त्यासाठी तरतूद करणे याचा फायदा आता निदर्शनास येतो आहे. बँकेच्या किरकोळ कर्जांबरोबर कार्पोरेट कर्जांनादेखील आता मागणी वाढते आहे. बँकेच्या कार्पोरेट कर्जांचा हिस्सा ३६ टक्के आहे, ज्यात गेल्या तिमाहीत बँकेने २१ टक्के वाढ साधली आहे. सरकारच्या उत्पादन निगडित प्रोत्साहन योजनेचा लाभ बँकेला मिळत आहे. बँकेचा कासा रेशो (बचत व चालू खात्यामधील ठेवीचे प्रमाण) चांगला असल्यामुळे पुढील काही महीने बँकेला कर्जावरील व्याजदर वाढीचा फायदा मिळेल. निकालांनंतर बँकेच्या समभागाने मोठी झेप घेतली. सध्याच्या ६०० रुपयांच्या पातळीवरून थोडी घसरण झाल्यावर गुंतवणुकीचा विचार करता येईल.
कोरोमंडल इंटरनॅशनल
खते, वनस्पती संरक्षण आणि पोषक रसायने या क्षेत्रातील ही अग्रेसर कंपनी आहे. कंपनीचे १६ उत्पादन प्रकल्प आणि देशभरात ७५० विक्री दालने पसरलेली आहेत. सप्टेंबर अखेरच्या तिमाहीत कंपनीच्या विक्रीत ६४ टक्के वाढ होऊन, तिने दहा हजार कोटींचा टप्पा पार केला आणि नफा ४२ टक्क्यांनी वाढून ७४० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. सध्या युरियाला पर्यायी खते वापरण्यास सरकार प्रोत्साहन देत आहे. ज्याचा कंपनीला आगामी काळात लाभ मिळेल. त्याशिवाय पीक संरक्षण क्षेत्रातही कंपनी आगेकूच करीत आहे. कंपनीने कच्च्या मालाबाबत स्वयंपूर्ण होण्याच्या योजना आखलेल्या आहेत. निकालांनंतर समभागात झालेल्या घसरणीमुळे ९२० रुपयांच्या पातळीवर या समभागात खरेदीची संधी निर्माण झाली आहे.