इण्ट्रो – गुंतवणुकीसाठी म्युच्युअल फंडाची निवड करताना, निधी व्यवस्थापकाने घेतलेली जोखीम, पोर्टफोलिओ टर्नओव्हर (मंथन), खर्चाचे गुणोत्तर (एक्सपेन्स रेशो) आणि मानदंडसापेक्ष फंडाची परतावा कामगिरी हे निकष महत्त्वाचे ठरतात. या निकषांच्या आधारे फ्रँकलिन इंडिया फ्लेक्झीकॅप फंड हा नव्याने गुंतवणुकीसाठी एक उत्कृष्ट फंड ठरतो, कसा त्याची ही मांडणी…
फ्रँकलिन इंडिया फ्लेक्झीकॅप फंड वैविध्यपूर्ण गुंतवणुकीमुळे अन्य फ्लेक्झीकॅप फंडांपेक्षा उजवा ठरला आहे. गुंतवणूक असलेल्या कंपन्यांचा व्यवसाय आणि बाजारातील मूल्यांकनांवर आधारित गुंतवणूक करून ही गुंतवणूक दीर्घकाळ राखून ठेवणे ही फंडाची रणनीती आहे. फंडाच्या शीर्ष गुंतवणुकीत ध्रुवीकरण नसतानाही यातील काही समभागांनी गेल्या काही महिन्यांत कामगिरीत सातत्य राखल्यामुळे फंड कमी-अस्थिर आणि मागील वर्षभराच्या कामगिरीत अव्वल ठरला आहे.
२२ फेब्रुवारी २०२० ते २२ मे २०२० हा नव्वद दिवसांचा कालावधी (थ्री मंथ्स रोलिंग रिटर्न्स) सर्वात जास्त नुकसान देणारा होता. जून २०२१ मध्ये फंडाच्या पोर्टफोलिओत मोठ्या प्रमाणावर केलेल्या सुधारणांमुळे (इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक आणि स्टेट बँकेची मात्रा वाढविणे) या फंडाच्या कामगिरीत मोठी सुधारणा दिसून आली. मागील तिमाहीत (जुलै सप्टेंबर) कालावधीत फ्लेक्झीकॅप फंड गटात रेग्युलर ग्रोथ एनएव्हीत सर्वाधिक वाढ नोंदविणारा हा फंड ठरला आहे.
‘मॉर्निंगस्टार डिरेक्ट’कडून उपलब्ध ॲसेट फ्लोज डेटा विशिष्ट फंड गटातील मालमत्ता स्तरांमधील बदल समजून घेण्यासाठी वापरला जातो. वापरकर्ते फंडातील निधीची आवक आणि जावक पाहून या फंड गटात कोणत्या फंडाला अधिक पैसे मिळत आहेत हे पाहू शकतात. मागील तिमाहीत फ्लेक्झीकॅप फंड गटात नवीन गुंतवणूक आकर्षित करणारा एचडीएफसी फ्लेक्झीकॅप नंतर फ्रँकलिन इंडिया फ्लेक्झीकॅप फंड दुसऱ्या क्रमांकावर असलेला फंड होता. ‘निफ्टी ५०० टीआरआय’च्या तुलनेत गेल्या तिमाही सहामाही आणि वर्षभराच्या कामगिरीशी तुलना करता, कामगिरीतील फरक कमी झाल्याचा संकेत तो देत आहे. एका वर्षाच्या चलत सरासरी परताव्याने ‘निफ्टी ५०० टीआरआय’ला मागे टाकले आहे. सहा महिन्यांपूर्वी हा फरक तीन टक्के होता.
गुंतवणुकीसाठी निवड करताना, निधी व्यवस्थापकाने घेतलेली जोखीम, पोर्टफोलिओ टर्नओव्हर (मंथन), खर्चाचे गुणोत्तर (एक्सपेन्स रेशो) आणि मानदंडसापेक्ष फंडाची परतावा कामगिरी या निकषांवर फ्रँकलिन इंडिया फ्लेक्झीकॅप फंड हा नव्याने गुंतवणुकीसाठी एक उत्कृष्ट फंड आहे.
निधी व्यवस्थापक :
आनंद राधाकृष्णन हे या फंडाचे निधी व्यवस्थापक असून, ते या फंड घराण्यांचे मुख्य गुंतवणूक अधिकारी देखील आहेत. ते या फंड गटातील निधी व्यवस्थापकांपैकी सर्वाधिक अनुभवी निधी व्यवस्थापक आहेत.
पोर्टफोलिओ मंथन :
हा सक्रिय व्यवस्थापित फंड असला तरी गुंतवणूक राखून ठेवण्याच्या रणनीतीमुळे फंड गटात पोर्टफोलिओ टर्न ओव्हर रेशो कमी असलेला हा फंड आहे. मागील सहा महिन्यांत निधी व्यवस्थापकांनी कोणत्याही कंपनीचा नव्याने समावेश केलेला नसून गुंतवणुकीतून करुर वैश्य बँकेला वगळले. आयसीआयसीआय बँक, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, ॲक्सिस बँक यांची मात्रा कमी केली. तर भारती एअरटेल, युनायटेड स्पिरीट्स, युनायटेड बीव्हरेजेस, आदित्य बिर्ला फॅशन्स यांची मात्रा वाढवली. फंडाचा पोर्टफोलिओ ५२ कंपन्यांचा असून बँका, आयटी आणि टेलिकॉम ही सर्वाधिक गुंतवणूक असलेली उद्योग क्षेत्रे असून, पोर्टफोलिओचा ४४ टक्के हिस्सा या तीन उद्योग क्षेत्रांनी व्यापला आहे. फंडाच्या गुंतवणुकीत ३० ओक्टोबर रोजी ७३.६४ टक्के लार्ज कॅप, १६.४३ टक्के मिड कॅप आणि ४.३७ टक्के स्मॉल-कॅप्सची व्याप्ती होती.
मानदंडसापेक्ष कामगिरी :
पोर्टफोलिओमध्ये फ्लेक्सी-कॅप फंडाचा समावेश करण्याचे नियोजन असलेल्या गुंतवणूकदारांनी फ्रँकलिन इंडिया फ्लेक्सी कॅप फंडाचा विचार करावा. सातत्यपूर्ण कामगिरीव्यतिरिक्त पोर्टफोलिओमध्ये मिड आणि स्मॉल-कॅप समभागांचा समावेश असूनही मुद्दल कमी न होऊ देण्यात हा फंड फ्लेक्झीकॅप फंड गटात अव्वल ठरला आहे. फंडाने, तीन आणि पाच वर्षांच्या कालावधीत मानदंडसापेक्ष, अनुक्रमे ४.९२ टक्के आणि ८.२६ टक्के अधिक वार्षिक परतावा मिळवला आहे. एक वर्ष वगळता या फंडाची कामगिरी या फंड गटात सर्वाधिक मालमत्ता असलेल्या एचडीएफसी फ्लेक्झीकॅपपेक्षा सरस ठरली आहे. वरील कालावधीत या फंडातील ‘एसआयपी’द्वारे केलेल्या गुंतवणुकीवर ऊत्कृष्ट परतावा देणाऱ्या फंडांमध्ये फ्रँकलिन इंडिया फ्लेक्झीकॅप फंडाचा समावेश आहे. सध्याची बाजाराची पातळी पाहता या फंडात ‘एसआयपी’द्वारा गुंतवणूक करण्याची शिफारस आहे.
वसंत माधव कुळकर्णी
shreeyachebaba@gmail.com
(म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजार जोखमींच्या अधीन असते. गुंतवणूक करण्यापूर्वी फंडाचे माहितीपत्रक कृपया सखोल अभ्यासा.)