भारतातले प्रसिद्ध उद्योगपती आणि अदाणी समूहाचे अध्यक्ष गौतम अदाणी यांची संपत्ती वाढली आहे. अदाणी यांनी बुधवारी (२९ नोव्हेंबर) इतकी कमाई केली की ते आता जगातल्या २० सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सामील झाले आहेत. अदाणी समूहाच्या शेअर्सची किंमतही वाढली आहे. त्यामुळे गौतम अदाणी यांच्या नेट वर्थमध्ये ६.५ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे. ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सनुसार गौतम अदाणी यांची नेट वर्थ आता ६७ अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. यासह जगातल्या सर्वात श्रीमंतांच्या यादीत ते आता १९ व्या स्थानावर आहेत.
अदाणी समूहाच्या शेअर्सच्या मार्केट कॅपमध्ये २८ नोव्हेंबर रोजी मोठी वाढ झाली. त्यांच्या शेअर्सचं मार्केट कॅप १.०४ लाख कोटी रुपयांनी वाढून ११.२९ लाख कोटी रुपयांवर पोहोचलं आहे. ११ एप्रिल २०२२ नंतर पहिल्यांदाच अदाणी समूहाने एवढी मोठी उडी घेतली आहे.
हिंडेनबर्गच्या अदाणी समूहाबद्दलच्या अहवालानंतर कंपनीला मोठा फटका बसला होता. परंतु, त्यातून अदाणी समूह आता सावरला आहे. हिंडेनबर्गच्या अहवलात केलेल्या दाव्यांप्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने हिंडेनबर्ग अहवालाला सत्य मानता येणार नाही, असं म्हटलं होतं. तसेच या अहवालाची सत्यता पडताळण्याचं कोणतंही साधन नाही. त्यामुळे न्यायालयाने सेबीला याप्रकरणी चौकशी करण्याचे आदेश दिले होते. हिंडेनबर्गच्या अहवालावरील न्यायालयाच्या टिप्पणीनंतर अदाणी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी वाढ झाली.
मुकेश अंबानी १३ व्या नंबरवर
दरम्यान, ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सने जाहीर केलेल्या श्रीमंतांच्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे १३ व्या स्थानावर आहेत. अंबानी यांची नेट वर्थ ९० बिलियन डॉलर्स इतकी आहे. तर टेस्ला आणि स्पेसएक्सचे प्रमुख एलॉन मस्क हे तब्बल २२८ बिलियन डॉलर्स इतक्या संपत्तीसह जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मस्क यांच्यानंतर अमेझॉनचे अध्यक्ष जेफ बेझोस यांचा नंबर लागतो. बेझोस यांची संपत्ती १७१ बिलियन डॉलर्स इतकी आहे. १३४ बिलियन डॉलर्स इतक्या संपत्तीसह बिल गेट्स चौथ्या क्रमांकावर आहेत. मार्क झुकरबर्क (१२३ बिलियन डॉलर्स) आणि वॉरन बफे (१२१ बिलियन डॉलर्स) हे अनुक्रमे आठव्या आणि नवव्या क्रमांकावर आहेत.