गोदरेज ग्रुप हा १२७ वर्ष जुना असलेला व्यावसायिक समूह आहे. १८९७ साली गोदरेजची स्थापना झाली होती. सव्वा शतक साबणापासून ते अनेक गृहपयोगी वस्तूंचे उत्पादन करणाऱ्या गोदरेज समूहाचे आता विभाजन होत आहे. गोदरेज कुटुंबियांनी परस्पर संमतीने विभाजनाच्या करारावर शिक्कामोर्तब केले आहे. गोदरेज कुटुंबातील आदी गोदरेज आणि त्यांचे भाऊ नादीर यांच्याकडे गोदरेज इंडस्ट्रीतील पाच सूचीबद्ध असलेल्या कंपन्या वाट्याला आल्या आहेत. तर त्यांचे चूलत भाऊ जमशेद आणि बहीण स्मिता गोदरेज यांच्या वाट्याला सूचीबद्ध नसलेली गोदरेज अँड बॉयस आणि याच्याशी संबंधीत इतर कंपन्या, तसेच गोदरेज समूहाच्या मालकीची जमीन आली आहे यात मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनीचाही समावेश आहे.

गोदरेज समूहाने दिलेल्या निवदेनानुसार गोदरेजच्या व्यावसायिक मंडळाची दोन भागात विभागणी करण्यात आली. एका बाजूला आदी गोदरेज आणि त्यांचा भाऊ नादीर गोदरेज आहेत. तर दुसऱ्या बाजूला चुलत भाऊ जमशेद गोदरेज, बहीण स्मिता गोदरेज आहेत.

जमशेद गोदरेज, स्मिता गोदरेज यांच्याकडे गोदरेज एंटरप्रायजेस ग्रुप आला आहे. ज्यामध्ये गोदरेज अँड बॉयस आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या कंपन्या आहेत. एरोस्पेस, एव्हिएशन ते संरक्षण, फर्निचर आणि आयटी सॉफ्टवेअर अशा अनेक उद्योगांमध्ये या कंपन्या व्यवहार करतात. जमशेद गोदरेज या ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक असतील तर त्यांची बहीण स्मिता गोदरेज कृष्णा यांची मुलगी न्यारिका होळकर (४२) या कार्यकारी संचालक असतील.

याशिवाय जमेशद आणि परिवाराकडे मुंबईतील गोदरेज समूहाची जमीन, ज्यामध्ये मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेली ३,४०० एकरची जमीनही आली आहे.

दरम्यान गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुप हा आदी आणि नादीर गोदरेज यांच्याकडे आला आहे. या ग्रुपमध्ये असलेल्या गोदरेज इंडस्ट्रिज, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज ॲग्रोव्हेट आणि ॲस्टेक लाइफ सायन्सेस या पाच सूचीबद्ध कंपन्या आल्या आहेत. सध्या नादीर गोदरेज हे या ग्रुपचे अध्यक्ष असतील तर आदी, नादीर आणि त्यांचे कुटुंबिय ग्रुपला नियंत्रित करतील.

आदी गोदरेज यांचा मुलगा पिरोजशा गोदरेज हे गोदरेज इंडस्ट्रीज ग्रुपचे (GIG) कार्यकारी उपाध्यक्ष असतील. तसेच ऑगस्ट २०२६ मध्ये ते नादीर गोदरेज यांची अध्यक्षपदाची जागा घेतील, असे कंपनीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

गोदरेज कुटुंबियांनी या विभाजनाला मालकी हक्काची पुनर्रचना (an ownership realignment) असे म्हटले आहे.

Story img Loader