भारतातील अतिशय जुन्या व्यावसायिक कुटुंबापैकी एक असलेल्या गोदरेज कुटुंबियांनी त्यांच्या १२७ वर्ष जुन्या गोदरेज समूहाचे विभाजन केले असल्याची घोषणा आज केली. गोदरेज समूहाचे बाजारमूल्य आज ५९ हजार कोटी एवढे आहे. मालकी हक्काची पुनर्रचना करणे आणि ध्येय-धोरणे राबविण्यात सुलभता यावी, यासाठी हे विभाजन करत असल्याचे गोदरेज समूहाकडून सांगण्यात आले आहे यापुढे आदी आणि नादीर गोदरेज हे गोदरेज इंडस्ट्रिजच्या अंतर्गत येणाऱ्या पाच सूचीबद्ध कंपन्यांचा कारभार पाहणार आहेत. तर त्यांचे चुलत भाऊ जमशेद आणि चुलत बहीण स्मिता गोदरेज या सूचीबद्ध नसलेल्या गोदरेज अँड बॉयस कंपनीचा कारभार पाहणार आहेत. तसेच गोदरेजची जमीनही त्यांच्याकडे असणार आहे. यामध्ये मुंबईतील मोक्याच्या ठिकाणी असलेल्या जमिनीचाही समावेश असेल.
गोदरेज समूहाने या विभाजनाला मालकी हक्काची पूनर्रचना (an ownership realignment) असे म्हटले आहे. कंपनीच्या धोरणात अधिक स्पष्टता आणून कारभाराला वेग आणने. कंपनीच्या भागधारकांसाठी दीर्घकालीन नफा मिळवून देणे. याशिवाय गुंतवणूकदारांना माहीत असाव्यात अशा काही गोष्टींची माहिती देत आहोत.
१२७ वर्षांपूर्वीच्या गोदरेज ग्रुपचे अखेर विभाजन; भावांमध्ये अशी झाली वाटणी
गोदरेजच्या विभाजनाचा गुंतवणूकदारांच्यादृष्टीने अर्थ काय?
१२७ वर्ष जुन्या असलेल्या गोदरेज समूहाचे दोन भागात विभाजन होणे, ही आतापर्यंतच्या समूहाच्या इतिहासातील सर्वात मोठी घटना आहे. समूहाच्या एरोस्पेस, हवाई वाहतूक, संरक्षण आणि लिक्विड इंजिन यासांरख्या क्षेत्राची यानिमित्ताने पुनर्रचना करण्यात आली आहे.
नियामक मंडळाची परवानगी
नियमाकाने हिरवा कंदील दाखविल्यानंतर समूहाचे विभाजन प्रत्यक्ष अमलात येईल. विभाजन झाले असले तरी गोदरेज एंटरप्रायजेस आणि गोदरेज इंडस्ट्रीज हे दोन्ही समूह गोदरेज या ब्रँडखालीच काम करणार आहेत.
सांशकता दूर होणार
विश्लेषक या विभाजनाकडे समूहातील सौहार्दपूर्ण करार म्हणून पाहत आहेत. यामुळे पूर्वीच्या तुलनेत अधिक स्पष्टता येत आहे. इकॉनॉमिक टाइम्सच्या अहवालानुसार, सूचीबद्ध आणि असूचीबद्ध अशा दोन्ही ठिकाणी असलेल्या अतिशय जटिल अशा समूहाची रचना पाहता या निर्णयामुळे गुंतवणूकदारांमधील संभ्रम दूर होईल.
विभाजनानुसार आता जमशेद गोदरेज (वय ७५) हे गोदरेज एंटरप्रायजेस समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नेतृत्व करतील. तर स्मिता गोदरेज यांची कन्या नीरिका होळकर (वय ४२) व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहतील. जमशेद गोदरेज यांनी यापूर्वी गोदरेज अँड बॉयस या कंपनीत व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष म्हणून अनेक दशके काम केलेले आहे. त्या अनुभवाचा त्यांना नव्या जबाबदारीसाठी नक्कीच लाभ होईल.
गोदरेज इंडस्ट्रीजमधील नेतृत्व बदल
गोदरेज इंडस्ट्रीजच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नादीर गोदरेज (वय ७३) यांच्या खांद्यावर आली आहे. इंडस्ट्रीजच्या अंतर्गत गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, गोदरेज प्रॉपर्टीज, गोदरेज ॲग्रोव्हेट आणि ॲस्टेक लाइफ सायन्सेस या पाच सूचीबद्ध कंपन्या आहेत. नादीर गोदरेज यांच्यासह आदी गोदरेज आणि त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती या समूहाची जबाबदारी हाताळतील.
बाजारावरील प्रभाव आणि भविष्यातील संभावना
इकॉनॉमिक टाइम्सच्या बातमीनुसार, सूचीबद्ध असलेल्या कंपन्याच्या समभागाच्या किंमतीवर तात्काळ काही परिणाम होणार नाही, असे विश्लेषकांना वाटते. कारण विभाजन होणार याची घोषणा झाली तेव्हाच याचा परिणाम झाला होता. तसेच समूहाच्या विभाजनाकडे सकारात्मकदृष्टीने पाहिले जात आहे. गोदरेज अँड बॉयस मालकीच्या मुंबईतील जमिनीचा विकास केल्यास भविष्यात गोदरेज प्रॉपर्टीजचा फायदा होऊ शकतो, असेही सांगितले जाते.
आपापसातील भागीदारी यापुढेही सुरू
गोदरेज अँड बॉयस आणि गोदरेज प्रॉपर्टीज यांनी मुंबईतील विक्रोळी परिसरात असलेल्या जमिनीचा विकास करण्यासाठी परस्पर सहमती दर्शविली आहे. ही भागीदारी केल्यामुळे विभाजन झाले असले तरी दोन्ही समूह एकमेकांमध्ये समन्वय राखून आहेत, हे अधोरेखित होते.