सोन्यात गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आठवड्याच्या पहिल्याच व्यवहाराच्या दिवशी चांगली बातमी आली असली तरी सोने खरेदी करणाऱ्यांना मोठा धक्का आहे. सोन्याच्या किमतीने पहिल्यांदाच ६०,००० रुपये प्रति १० ग्रॅमचा टप्पा पार केला आहे. शेअर बाजारातील घसरणीमुळे सोन्याचा भाव वधारला आहे. बँकिंग संकट अधिक गडद झाल्यामुळे जगभरातील शेअर बाजारात खळबळ उडाली असून, त्याचा फायदा सोन्याला झाला आहे. मल्टी कमोडिटी इंडेक्स (MCX) वर ५ एप्रिलच्या डिलिव्हरीसाठीच्या सोन्याचा भाव ९७० रुपये म्हणजेच १.६१ टक्क्यांनी वाढून ६०,३३८ रुपयांवर व्यवहार करीत आहे. यापूर्वी MCX वर त्याचा सर्वकालीन उच्चांक ५८,८४७ रुपये प्रति १० ग्रॅम होता. सोने ही सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. सध्याच्या आर्थिक परिस्थितीत सोन्याला बरीच गती मिळाली आहे. येत्या काही दिवसांत ते ६४,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत जाऊ शकते. या आठवड्यात होणारी अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक त्यासाठी महत्त्वाची मानली जात आहे. त्यानंतरच सोन्याचा मार्ग निश्चित होईल.
मेहता इक्विटीजचे व्हीपी (कमोडिटीज) राहुल कलंत्री म्हणाले की, सोने ही सुरक्षित गुंतवणूक आहे. सोन्याचे भाव वाढण्यासाठी सध्या आर्थिक परिस्थिती योग्य आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची किंमत २,१८५ प्रति औंस डॉलर (२८.३४ ग्रॅम) पर्यंत जाऊ शकते. देशांतर्गत स्तरावर त्याची किंमत ६४,००० रुपयांपर्यंत पोहोचू शकते. सिलिकॉन व्हॅली बँक आणि इतर बँकांच्या पडझडीमुळे बँकिंग संकट निर्माण झाले आहे. त्यामुळे गुंतवणूकदार सोन्याकडे वळले आहेत. यूएस बाँडच्या दर डळमळीत झाला असून, डॉलर निर्देशांकही घसरला आहे. त्यामुळे सोन्यासाठी ही अनुकूल स्थिती आहे. यूएस फेडरल रिझर्व्हची बैठक २२ मार्च रोजी होणार आहे. त्या बैठकीतील धोरणानंतरच भविष्यातील सोन्याची वाटचाल निश्चित होणार आहे.
सोन्याचा भाव का वाढतोय?
आयआयएफएल सिक्युरिटीजचे उपाध्यक्ष (कमोडिटी अँड करन्सी रिसर्च) अनुज गुप्ता यांनी सांगितले की, पुढील एका महिन्यात सोन्याची किंमत ६२,००० रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत पोहोचू शकते. सध्या ६०,००० रुपयांना ते विकत घेता येईल, असे त्यांनी सांगितले. म्हणजेच आता कोणी सोने विकत घेतल्यास महिन्याभरात त्याला दोन हजार रुपयांचा नफा मिळू शकतो. गुप्ता म्हणाले की, अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेवर दबाव वाढत आहे. त्यामुळे फेड रिझर्व्हकडे दर वाढवण्यासाठी पुरेशी जागा आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. अनिश्चिततेच्या काळात सोने ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. त्यामुळेच बँकिंग संकट आणि मंदीच्या भीतीने सोन्याची चमक वाढली आहे. MCXवर ५ मे रोजी डिलिव्हरीसाठी चांदीचा भावही १.२८ टक्क्यांनी वाढून ६९.३७९ रुपये प्रति किलो झाला.