Gold From London To New York: गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये अमेरिकेत झालेल्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी दमदार विजय मिळवत राष्ट्राध्यक्षपदी पुनरागमन केले आहे. अमेरिकेची सूत्रे पुन्हा हाती घेतल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक निर्णयांचा धडाका लावला आहे. यामध्ये अतिरिक्त आयात शुल्क लादण्याच्या निर्णयाचाही समावेश आहे. पण, ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे त्याचे अनेक परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
लंडन-न्यूयॉर्क सोने वाहतूक
ट्रम्प यांच्या आयात शुल्काच्या धमक्यांमुळे अमेरिका आणि युरोपमधील व्यापारात अडथळा निर्माण झाला आहे, ज्यामुळे सोन्याच्या बाजारपेठेत मोठे बदल झाले आहेत. व्यापार अनिश्चिततेमुळे अमेरिकेत सोन्याच्या किमतीत वाढ झाल्याने लंडनहून न्यू यॉर्कला सोने वाहतूक करण्याचे प्रमाण वाढले आहे. दरम्यान, गेल्या काही वर्षांमधील ही सोन्याची सर्वात मोठी वाहतूक आहे. जेपी मॉर्गन चेस आणि एचएसबीसीसह आघाडीच्या जागतिक बँका दोन्ही बाजारपेठांमधील किमतीतील तफावतीचा फायदा घेत लंडनहून न्यूयॉर्कला सोने नेण्यासाठी व्यावसायिक विमानांचा वापर करत आहेत. याबाबत वॉल स्ट्रीट जर्नलने वृत्त दिले आहे.
सोन्याच्या किमतीतील तफावत
अमेरिकेच्या व्यापार धोरणांच्या चिंतेमुळे सोन्याच्या किमती विक्रमी उच्चांकावर पोहोचल्या आहेत, या वर्षी न्यू यॉर्कमध्ये सोन्याच्या वायद्यांच्या किमती ११ टक्क्यांनी वाढल्या आहेत. विश्लेषकांचा अंदाज आहे की लवकरच यामध्ये आणखी वाढ होऊ शकते. दरम्यान, लंडनमधील सोन्याच्या किमती मात्र, घसरल्या असून, डिसेंबरच्या सुरुवातीपासून त्या प्रति औंस सुमारे २० डॉलर्सने कमी झाल्या आहेत.
बँकांसह सोने व्यापारी घेत आहेत फायदा
दरम्यान सोने उद्योगाशी संबंधित असलेल्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लंडन आणि न्यूॉर्कमधील सोन्याच्या किमतीतील तफावतीचे कारण अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्या आयात शुल्क लादण्याच्या धमक्या आहेत. याचबरोबर ट्रम्प यांनी युरोपच्या व्यापार धोरणांवर टीका केली आहे, तसेच युरोपवर आणखी आयात शुल्क लादण्याचे संकेत दिले आहेत. अतिरिक्त आयात शुल्काचा थेट सोन्यावर परिणाम होत नसला तरी, बाजारपेठेत यामुळे तीव्र प्रतिक्रिया उमठत आहेत. तसेच व्यापारीही या किमतीतील तफावतीचा फायदा घेत आहेत.
न्यू यॉर्कमधील वाढत्या किमतींचा फायदा घेण्यासाठी, बँका लंडनच्या तिजोरी आणि स्विस रिफायनरीजमधून मोठ्या प्रमाणात सोने काढून घेत आहेत आणि ते फ्युचर्स कॉन्ट्रॅक्टमध्ये डिलिव्हरी करण्यासाठी अमेरिकेत नेत आहेत. एकट्या जेपी मॉर्गनने या महिन्यात ४ अब्ज डॉलर्स किमतीचे सोने डिलिव्हर करण्याची योजना आखली आहे.