गुगलची मूळ कंपनी असलेल्या अल्फाबेटने १२,००० कर्मचार्यांना काढून टाकल्यानंतर उर्वरित कर्मचार्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कर्मचार्यांची आणखी कपात होण्याची भीती असल्याने आता कर्मचार्यांनी थेट गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनाच खुले पत्र लिहिले आहे. अल्फाबेटच्या कर्मचाऱ्यांनी आता सीईओ सुंदर पिचाई यांना खुले पत्र दिल्यानं तो चर्चेचा विषय ठरत आहे. या पत्रात त्यांनी पिचाई यांच्याकडे ५ मागण्या केल्या आहेत. पिचाई यांनी या मागण्या जाहीरपणे मंजूर कराव्यात, असे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यास सक्षम असल्यानं त्यांनी ही मागणी केली आहे.
या कपातीच्या काळात कर्मचाऱ्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष होत असल्याची खदखद कर्मचाऱ्यांनी खुल्या पत्रात व्यक्त केली आहे. सध्या कोणताही कर्मचारी एकटा त्याच्या हक्कांचे संरक्षण करू शकत नाही. त्यामुळेच आता कंपनीच्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे आपल्या मागण्यांबाबत कंपनीला खुले पत्र लिहून भावना व्यक्त केल्या आहेत.
पहिल्यांदा नव्या भरतीवर बंदी घाला
कंपनीत जोपर्यंत नोकर कपात सुरू आहे, तोपर्यंत अल्फाबेटमध्ये नवीन कर्मचाऱ्यांची भरती करू नये, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी खुल्या पत्रात केली आहे. भविष्यात कंपनीला कर्मचाऱ्यांना कामावर ठेवायचे असल्यास कंपनीने आधी काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना पहिल्यांदा प्राधान्य द्यावे.
काढून टाकलेल्यांना नोकरी शोधण्यात मदत करा
खुल्या पत्रात कर्मचार्यांनी गुगलच्या सीईओला सांगितले की, जर एखाद्या कर्मचार्याला कामावरून काढून टाकले असेल तर त्याला त्याच्या पूर्ण नोटिस कालावधी पूर्ण करण्याची परवानगी द्यावी. यासोबतच कंपनीने काढून टाकलेल्या कर्मचाऱ्यांना नोकरी शोधण्यात मदत करावी. तसेच युक्रेन, रशिया या युद्धांत सापडलेल्या देशातील कर्मचाऱ्यांना काढून टाकू नका, असे आवाहनही कर्मचाऱ्यांनी केले आहे.
नियोजित रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्याची नोकरी जाऊ नये
नियोजित रजेवर गेलेल्या कर्मचाऱ्याला रजेची मुदत संपेपर्यंत नोकरीवरून काढून टाकण्याची नोटीस देऊ नये, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी सुंदर पिचाई यांना लिहिलेल्या खुल्या पत्रात केली आहे. नोटीस दिलेल्या कर्मचार्यांना वैयक्तिकरित्या सूचित केले पाहिजे आणि त्यांना कंपनीतून सन्मानाने बाहेर पडण्याची संधी दिली पाहिजे. कर्मचार्यांना कामावरून काढून टाकताना लिंग, वय किंवा वांशिक ओळख, जात, धर्म इत्यादी आधारावर कोणताही भेदभाव होणार नाही, याची खात्री करून घ्यायला हवी.