Bharat Brand sale in Reliance Retail: दिवाळीच्या मुहूर्तावर केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. गरीब आणि मध्यमवर्गीयांना सवलतीच्या दरात अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी सरकारतर्फे भारत ब्रँडची निर्मिती करण्यात आली होती. दिवाळीमध्ये ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागू नये, यासाठी सरकारकडून आता रिलायन्स रिटेलशी चर्चा करण्यात येत आहे. ही चर्चा यशस्वी ठरल्यास रिलायन्स रिटेलच्या दुकानांत भारत ब्रँडच्या वस्तूंची अनुदानित किंमतीमध्ये विक्री करण्यात येईल. केंद्र सरकारकडून पहिल्यांदाच अशाप्रकारे खासगी वितरकाच्या माध्यमातून भारत ब्रँडच्या वस्तूंची विक्री केली जाणार आहे.

भारत ब्रँडकडून पिठ, तांदूळ आणि डाळींची रास्त दरात विक्री केली जाते. याआधी रिलायन्स जिओ मार्ट, ॲमेझॉन आणि बिगबास्केट अशा ई-कॉमर्स साईटवर थोड्या कालावधीसाठी भारत ब्रँडची विक्री केली होती. मात्र आता रिलायन्स रिटेलशी दीर्घ कालावधीसाठी करार करण्यात आला आहे. केंद्र सरकारकडे असलेल्या राखीव साठ्याला अनुदानित दरात रिलायन्स रिटेलमध्ये विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहे. रिलायन्सशिवाय डीमार्ट आणि इतर सुपर मार्केट स्टोअरशीही चर्चा केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी इकॉनॉमिक टाइम्सने दिली आहे.

या विषयावर रिलायन्स रिटेलची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न इकॉनॉमिक टाइम्सने केला, मात्र त्यांना याबाबत रिलायन्सची प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

२०२३ साली केंद्र सरकारने भारत आटा, भारत डाळ आणि भारत तांदूळ ही उत्पादने किरकोळ बाजारात आणले होते. दारिद्ररेषेखाली नसल्यामुळे ज्या लोकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेचा लाभ मिळत नाही, असा लोकांना रास्त दरात अन्नधान्य मिळवून देण्यासाठी भारत ब्रँड सुरू करण्यात आला होता.