GST Council Meeting Outcome Cancer Medicine : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्या अध्यक्षतेखाली जीएसटी परिषदेची ५४ वी बैठक आज (सोमवार, ९ सप्टेंबर) पार पडली. कंपन्या व उद्योगजगतासह सामान्य नागरिकांचंही या बैठकीकडे लक्ष लागलं होतं. दरम्यान, या बैठकीत जीएसटी परिषदेने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. २,००० रुपयांहून अधिक रकमेच्या ऑनलाईन पेमेंट्सवर जीएसटी लागू केला जाणार असल्याच्या बातम्या कालपासून पाहायला मिळत होत्या. मात्र जीएसटी परिषदेने आजच्या बैठकीत याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
जीएसटी परिषदेने कर्करोगावरील उपचारांसाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांवरील जीएसटी कमी केला आहे. पूर्वी कर्करोगावरील औषधांवर १२ टक्के जीएसटी आकारला जात होता. मात्र आता ही औषधं स्वस्त होणार आहेत, कारण या औषधांवर केवळ ५ टक्के जीएसटी आकारला जाईल. या निर्णयामुळे कर्करोगावरील उपचारांवर होणारा खर्च काही प्रमाणात कमी होईल.
हे ही वाचा >> अनिल अंबानींची रिलायन्स ई-वाहनांच्या निर्मितीत उतरणार? २.५ लाख गाड्यांचं प्राथमिक लक्ष्य
आरोग्य व जीवन विमा स्वस्त होणार
आरोग्य व जीवन विमा पॉलिसीच्या प्रीमियमवर (हप्ता) १८ टक्के जीएसटी आकारला जात होता. मात्र हा जीएसटी कमी करण्यावर जीएसटी परिषदेच्या बैठकीत सर्व सदस्यांचं एकमत झालं आहे. मात्र, विम्याच्या प्रीमियमवर किती टक्के जीएसटी आकारला जाणार त्याबाबत आजच्या बैठकीत निर्णय होऊ शकला नाही. यावर येत्या नोव्हेंबर महिन्यात अंतिम निर्णय घेतला जाईल. नोव्हेंबर महिन्यात जीएसटी परिषदेची पुढील (५५ वी) बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्या बैठकीत आरोग्य व जीवन विमा पॉलिसीच्या प्रीमियमवरील जीएसटीबाबतचा निर्णय घेतला जाईल.
फरसाण स्वस्त होणार
सध्या फरसाणावर देशात १८ टक्के जीएसटी आकारला जात आहे. आता हा जीएसटी कमी करण्यात आला असून फरसाणावर १२ टक्के जीएसटी आकारला जाईल. त्यामुळे फरसाण स्वस्त होईल.
हे ही वाचा >> Adani Group: अदाणी समूहाचा बांगलादेशला इशारा; “गोड्डा वीज प्रकल्पाची ५० कोटी डॉलर्सची थकबाकी…”!
जीएसटी परिषदेची बैठक दिल्लीबाहेर होणार
जीएसटी परिषदेच्या आजवरच्या ५४ बैठका दिल्लीत झाल्या आहेत. मात्र यापुढील बैठका दिल्लीव्यतिरिक्त इतर शहरांमध्ये घेतल्या जातील. ५५ वी बैठक दिल्लीतच होणार आहे. मात्र ५६ वी बैठक दिल्लीबाहेर होणार आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत परदेशी कंपन्याद्वारे आयात केल्या जाणाऱ्या सेवांवर सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला.
कारच्या सीट्सवरील जीएसटी वाढवला
कारच्या सीट्सवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून २८ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला आहे.
हे ही वाचा >> ‘हे खा’, ‘ते खा’ सांगणे म्हणजे धर्म नव्हे, सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांचे मत
हेलिकॉप्टरद्वारे केली जाणारी तीर्थयात्रा स्वस्त होणार
हेलिकॉप्टरद्वारे केल्या जाणाऱ्या तीर्थयात्रांवरील जीएसटी १८ टक्क्यांवरून पाच टक्के करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.
ऑनलाइन गेमिंगद्वारे सरकारला हजारो कोटींचा महसूल
ऑनलाइन गेमिंगद्वारे सरकारला मिळणाऱ्या महसुलात मोठी वाढ झाली आहे. मागील सहा महिन्यांमध्ये केंद्र सरकारला याद्वारे तब्बल ६,९०९ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. सरकार ऑनलाइन गेमिंगवर २८ टक्के जीएसटी आकारते.