GST on Term Life Insurance and Health Cover Premium: आरोग्य आणि जीवन विमा हप्त्यांवरील वस्तू आणि सेवा कर अर्थात ‘जीएसटी’चा दर कमी करण्याबाबतची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. नुकत्याच झालेल्या ‘जीएसटी परिषदे’च्या बैठकीत यावर सकारात्मक निर्णय झाल्याचे बोलले जात आहे. आयुर्विमा आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्य विम्याच्या हप्त्यावरील जीएसटी कमी करण्याबाबत मंत्रिगटाच्या शनिवारी झालेल्या बैठकीत निर्णय झाला असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय २० लिटर बाटलीबंद पाण्यावरील जीएसटी (१८ टक्क्यांवरून ५ टक्के), १० हजारांच्या खालील सायकली (१२ टक्क्यांवरून ५ टक्के) आणि वह्यावरील (१२ टक्क्यांवरून ५ टक्के) जीएसटी कमी केला जाऊ शकतो.
कोणत्या वस्तू महाग होणार?
आयुर्विमा आणि आरोग्य विम्यावरील जीएसटी कमी करत असताना मंत्रिगटाने काही वस्तूंवरील जीएसटी वाढविण्याचा प्रस्ताव दिला आहे. जसे की, २५ हजारांवरील महागडी घड्याळे, १५ हजार रुपयांवरील बुट यांच्यावरील जीएसटी १८ टक्क्यांवरून २८ टक्के होण्याची शक्यता आहे. हे बदल केल्यास २२ हजार कोटींचा महसूल वाढू शकतो, असे बिहारचे उपमुख्यमंत्री आणि मंत्रिगटाच्या बैठकीचे समन्वयक सम्राट चौधरी यांनी सांगितले.
याशिवाय ब्युटी प्रॉडक्ट्स जसे की, हेअर ड्रायर्स, हेअर कर्लर्स आणि इतर उत्पादनांवरील जीएसटीही वाढविला जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
जीएसटीच्या कराची पुनर्रचना आणि मूल्यांकन करण्यासाठी सहा जणांची समिती गठीत केलेली आहे. यामध्ये सम्राट चौधरी यांच्यासह उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री सुरशे कुमार खन्ना, राजस्थानचे आरोग्य मंत्री गजेंद्र सिंह, कर्नाटकचे अर्थमंत्री कृष्णा गौडा आणि केरळचे अर्थमंत्री के. ए. बालागोपाल यांचा समावेश आहे. सम्राट चौधरी म्हणाले की, मंत्रिगटातील प्रत्येकाचा हाच अट्टाहास आहे की, सामान्य माणूस आणि वृद्धांवरील कराचा बोजा कमी केला पाहीजे. आम्ही आमचा अहवाल जीएसटी परिषदेला सुपूर्द करू. नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत अंतिम निर्णय घेण्यात येईल.