HDFC Bank Savings Account Interest Rate News : भारतातल्या खासगी क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेने त्यांच्या ग्राहकांना धक्का दिला आहे. कारण या बँकेने बचत खात्यामधील (सेव्हिंग्स अकाउंट) पैशांवरील व्याजदरांत मोठी कपात केली आहे. देशातील सर्वात मोठी खासगी बँक अशी ओळख असूनही ही बँक आता सेव्हिंग अकाउंटवर इतर बँकांच्या तुलनेत सर्वात कमी व्याज देणार आहे. आम्ही इथे एचडीएफसी बँकेबद्दल माहिती देत आहोत.

एचडीएफसी बँकेने त्यांच्या बचत खात्यावरील व्याजदरांत ०.२५ टक्क्यांनी कपात केली आहे. ही बँक आता बचत खात्यावर २.७५ टक्के व्याज देईल. तसेच ज्या व्यक्तीच्या बँक खात्यात ५० लाखांहून अधिक रक्कम आहे त्यांना ३.२५ टक्के व्याज मिळेल. यायाधी ५० लाखांहून अधिक रकमेवर ३.५० टक्के व्याज दिलं जात होतं. यामध्ये देखील ०.२५ टक्के कपात करण्यात आली आहे. बँकेने जाहीर केलेले नवे व्याजदर १२ एप्रिलपासून लागू करण्यात आले आहेत.

बचत खात्यावरील व्याज म्हणजेच बँकेत ठेवलेल्या पैशांवर मिळणारा परतावा. बचत खात्यातील पैसे ग्राहक कधीही काढू शकतात, तसेच कधीही त्यात पैसे भरू शकतात. त्यामुळे तुमच्या बँक खात्यात पैसे जितका वेळ तुम्ही ठेवाल त्यावर त्या प्रमाणात व्याज दिलं जातं.

इतर बँकांचे व्याजदर किती आहेत?

भारतीय रिझर्व्ह बँकेने अलीकडेच रेपो दरांत कपात केली आहे. त्याचाच बँकांच्या व्याजदरांवर परिणाम झाल्याचं बोललं जात आहे. इतर बँकांच्या बचत खात्यावरील व्याजदरांबाबत बोलायचं झाल्यास आयसीआयसीआय बँक, अ‍ॅक्सिस बँक बचत खात्यात ५० लाखांहून कमी रक्कम असल्यास ३ टक्के व्याज देते.

एचडीएफसीकडून मुदत ठेवींवरील व्याजदरांतही कपात

एचडीएफसी बँकेने अलीकडेच त्यांच्या फिक्स्ड डिपॉझिटवरील (मुदत ठेव) व्याजदरांत कपात केली आहे. १ एप्रिलपासून बँकेने त्यांच्या काही निवडक मुदत ठेवींवरील व्याजदरांत ०.३५ ते ०.४० टक्क्यांची कपात केली होती.

बचत खात्यावरील व्याज कसं मिळतं?

उदाहरणार्थ, तुमच्या बचत खात्यात १०,००० रुपये आहेत आणि बँक दरवर्षी ४ टक्के व्याज देत असेल, तर वर्षाखेरीस तुम्हाला ४०० रुपये अतिरिक्त (परतावा) मिळतात. आता एचडीएफसी बँक २.७५ टक्के व्याज देतेय. याचाच अर्थ तुमच्या एचडीएफसी बँकेच्या बचत खात्यात १०,००० रुपये असतील तर वर्षाखेरीस तुम्हाला २७५ रुपयांचा परतावा मिळेल.