Mehul Choksi Extradition: पंजाब नॅशनल बँकेचा घोटाळा उघड करणारे हरिप्रसाद एसव्ही यांनी कर्जबुडव्या मेहुल चोक्सीच्या प्रत्यार्पणाबाबत शंका व्यक्त केली आहे. बेल्जियम पोलिसांनी चोक्सीला (वय ६५) शनिवारी अटक केल्याची माहिती समोर आली आहे. मेहुल चोक्सीवर १३ हजार ५०० कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. एएनआय वृत्तसंस्थेशी बोलत असताना श्रीनिवास एसव्ही म्हणाले की, चोक्सीचा खिसा भरलेला आहे. त्याच्या दिमतीला युरोपमधील मोठे वकील येऊ शकतात.

हरीप्रसाद एसव्ही यांनी पुढे म्हटले की, डॉमिनिका येथे मागे अटक झाली असताना कायदेशीर प्रक्रियेतून चोक्सी निसटला होता. चोक्सीचे प्रत्यार्पण हे सोपे काम नाही. त्याचा खिसा भरलेला आहे. विजय मल्ल्याप्रमाणे चोक्सीदेखील प्रत्यार्पण टाळण्यासाठी युरोपमधील सर्वात चांगले वकील नेमण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला भारतात आणणे तितके सोपे होणार नाही.

याआधीही अँटिग्वा आणि इतर कॅरेबियन बेटांवर त्याला ताब्यात घेण्यात आले होते. मात्र वकिलांच्या मदतीने तो निसटला होता. मात्र यावेळी भारत सरकारच्या प्रयत्नांना यश यावे आणि चोक्सीला भारतात आणले जावे, अशी मी प्रार्थना करतो, असेही श्रीनिवास एसव्ही एएनआयशी बोलताना म्हणाले.

मेहुल चोक्सीने १०० हून अधिक फ्रँचाईझींना फसवले आहे. यानंतर या फ्रँचाईझींकडून भारतातील विविध शहरात त्याच्याविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. बंगळुरू पोलिसांकडून चोक्सीला अटक करण्याचे आदेश मी मिळवले होते. पण त्यावेळीही चोक्सी हुशारीने निसटला. कायद्याला बगल देण्यासाठी त्याच्याकडे टीम तयारच आहे, असेही त्यांनी सांगितले.

भारताची कायदेशीर प्रणाली नक्कीच अतिशय परिणामकारक आहे. पण प्रत्यार्पणासाठी आपण ज्या देशांशी व्यवहार करत आहोत, त्यांच्याशी आपले संबंध कसे आहेत? यावर सर्व निर्धारित असते. चोक्सीकडे खूप पैसे आहेत, त्यामुळे हे प्रकरण साधेसुधे नाही, अशीही माहिती श्रीनिवास यांनी दिली.

२०१८ साली भारतातून काढला पळ

हरिप्रसाद यांनी २६ जुलै २०१६ रोजी पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून पीएनबी घोटाळ्याबाबत चिंता व्यक्त केली होती. बॅसन्स शीटमध्ये संशयास्पद नोंदी आढळल्या असून मोठा घोटाळा होत असल्याची शक्यता त्यांनी वर्तविली होती. यानंतर पुढे २ जानेवारी २०१८ रोजी मेहुल चोक्सीने भारतातून पळ काढला.