Home Loan EMI Tips : अनेकजण आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी कर्ज घेतात. यापैकी एक म्हणजे गृहकर्ज. मध्यमवर्गीय व अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांना गृहकर्जाशिवाय शहरात घर खरेदी करता येत नाही. कारण घर खरेदी करणं सोपं काम नाही. मुंबई, दिल्ली, गुरुग्राम, कोलकाता, चेन्नई, बंगळुरू व पुण्यासारख्या शहरांमधील घरांच्या किंमती गगनाला भिडलेल्या आहेत. या शहरांत स्वतःचं घर खरेदी करताना बहुसंख्य कुटुंबांनी गृहकर्जाचा पर्याय स्वीकारला आहे. मात्र लाखो रुपयांचं कर्ज फेडणं देखील अवघड असतं.
असेही काही लोक असतात जे कर्ज घेऊन घर विकत घेतात; परंतु, त्यांच्या गृहकर्जाचा मासिक ईएमआय भरणं त्यांना अवघड जातं. दोन-तीन हप्ते थकल्यानंतर बँका मोठा दंड वसुल करतातच, त्याचबरोबर बँकेचे वसुली करणारे एजंट त्रास देतात. अशा वेळी आपल्या सामाजिक प्रतिष्ठेचं नुकसान होईल अशी भिती देखील या लोकांमध्ये असते. अनेकजण कर्ज फेडू न शकल्यामुळे आत्महत्या देखील करतात. दरम्यान, आम्ही तुम्हाला गृह कर्जावरील ईएमआयच्या समस्येतून कसं बाहेर पडता येईल याबाबतच्या काही टिप्स देणार आहोत.
बचतीद्वारे गृहकर्जाची आगाऊ रक्कम भरा
तुम्हाला गृहकर्जाचा हप्ता भरणं कठीण जात असेल तर तुम्ही तुमच्या बचतीतून कर्जाचं प्री-पेमेंट करू शकता. यामुळे ही रक्कम तुमच्या मूळ रकमेतून (मुद्दल) वजा होईल. परिणामी ईएमआय देखील कमी होईल.
गृहकर्जाचा अवधी वाढवा
तुम्हाला हप्ता खूप मोठा वाटत असेल तर गृहकर्जाचा अवधी वाढवून घ्या आणि हप्त्याची रक्कम कमी करून घ्या. असं केल्यास तुम्हाला कमी ईएमआय भरावा लागेल. मात्र तुमचं व्याज वाढेल.
कमी ईएमआयसाठी गृहकर्ज हस्तांतरित करा
तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतलं आहे त्या बँकेपेक्षा कमी व्याजदरात दुसरी कुठली बँक कर्ज देत असेल किंवा इतर बँकेकडे उत्तम ऑफर असेल तर तुमचं गृहकर्ज त्या बँकेकडे हस्तांतरित करा. त्या बँकेचा व्याजदर कमी असेल तर तुमच्या हप्त्याची रक्कम कमी होईल.
सिबील स्कोरच्या आधारावर व्याजदर कमी करून घ्या
तुम्ही तुमच्या बँकेशी संपर्क करून व्याजदर कमी करून घेऊ शकता. त्यासाठी तुम्ही तुमच्या उत्तम सिबील स्कोरचा आधार घेऊ शकता.