Tesla Car Cost In India: इलेक्ट्रिक वाहन निर्माण क्षेत्रातील जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या टेस्लाने भारतात पाऊल ठेवण्याची तयारी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकताच अमेरिका दौरा संपन्न झाला. या दौऱ्यात मोदी आणि टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांची भेट झाली. यावेळी टेस्ला कंपनीच्या वाहनावर असलेले आयात शुल्क कमी करण्यासंदर्भात चर्चा झाली होती. त्याप्रमाणे २० टक्क्यांनी आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला गेला. यामुळे टेस्ला वाहनांच्या किंमतीमध्ये घट होणार आहे. तसेच टेस्लाने दिल्ली आणि मुंबई येथे शोरूम सुरू करण्यासंदर्भात पावले उचलली असल्यामुळे भारतीय ग्राहकांना आता टेस्लाचे वेध लागले आहेत. तसेच वाहनाची किंमत किती असेल? याचीही अनेकांना उत्सुकता आहे.

भारतात टेस्लाचे सर्वात स्वस्त वाहन जवळपास ३५ ते ४० लाखांना मिळू शकते, असे सीएलएसएच्या अहवालात म्हटले आहे. या अहवालात पुढे म्हटले की, टेस्लाचे सर्वात स्वस्त मॉडेल ३ हे अमेरिकेत जवळपास ३५,००० डॉलर्सना (भारतीय रुपयांमध्ये ३०.४ लाख) विकले जाते. आता भारताने २० टक्क्यांनी आयात शुल्क कमी केले आहे. त्याबरोबर इतर खर्च जसे की, रोड टॅक्स आणि विम्याची रक्कम धरून टेस्ला वाहनाची ऑन रॉड किंमत ४० हजार डॉलरपर्यंत जाऊ शकते. भारतीय रुपयांमध्ये ही किंमत ३५-४० लाखांपर्यंत जाऊ शकते.

या अहवालात पुढे म्हटले की, टेस्लाने मॉडेल ३ ची किंमत इतर स्पर्धक कंपन्या जसे की, महिंद्रा एक्सइव्ही ९ई, ह्युंदाई ई-क्रेटा, मारुती सुझुकी ई-विटारा यासांरख्या देशी ईव्ही वाहनांच्या किंमतीपेक्षा २०-२५ टक्क्यांनी अधिक ठेवली तर त्याचा भारतीय ईव्ही बाजारपेठेवर लक्षणीय बदल होण्याची शक्यता कमीच आहे.

जर टेस्लाने त्यांचे एंट्री लेव्हलचे मॉडेल २५ लाखांच्या किंमतीपेक्षा कमी ठेवून बाजारात उतरवले तर त्याचा परिणाम दिसून येऊ शकतो. त्यांचे मार्केट शेअर वाढू शकते. याचा शेअर बाजारावर आतापासूनच परिणाम दिसून आला आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे शेअर गेल्या काही दिवसांपासून गडगडले आहेत. तथापि, या अहवालात असेही नमूद केले आहे की, टेस्लाच्या भारतातील प्रवेशामुळे भारतीय वाहन उत्पादक कंपन्यांवर फारसा फरक पडणार नाही. कारण चीन, युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेत भारतात ईव्हीचा तेवढा प्रसार झालेला नाही.

टेस्ला कोणत्या पदांची भरती करणार?

दरम्यान टेस्ला कंपनी भारतात नोकरभरती करण्याच्या विचारात आहे. यासंदर्भात त्यांनी लिंक्डइन पेजवर जाहीरात केली आहे. लिंक्डइन पेजवरील जाहिरातीनुसार कस्टमर सर्व्हिस आणि बॅकएंड कामांसाठी ते १३ पदे भरणार आहेत. तसेच, सेवा तंत्रज्ञ आणि विविध सल्लागार भूमिकांसह किमान पाच पदे मुंबई आणि दिल्ली या दोन्ही ठिकाणांहून भरण्यात येणार आहेत. तर उर्वरित पदे, जसे की कस्टमर एंगेजमेंट मॅनेजर आणि वितरण ऑपरेशन्स विशेषज्ञ मुंबईतून भरण्यात येणार आहेत.

ही भरती कंपनीच्या भारतीय बाजारपेठेत प्रवेशाच्या योजनांचा भाग आहे का? या प्रश्नावर टेस्लाकडून अद्याप अधिकृतरित्या उत्तर मिळू शकलेले नाही. शिवाय भारतीय बाजारपेठेत वाहनांची विक्री सुरू करण्याची संभाव्य वेळेबाबत देखील तिने अद्याप कोणतेही स्पष्ट संकेत दिलेले नाहीत.

Story img Loader