Mukesh Ambani in Hurun Global Rich List: भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा जगातील टॉप १० श्रीमंताच्या यादीतील क्रमांक घसरला आहे. वाढत्या कर्जामुळे मागच्या वर्षीपेक्षा यावेळी मुकेश अंबानी यांची संपत्ती १ लाख कोटीने कमी झाली आहे. ‘हुरुन ग्लोबल रिच लिस्ट २०२५’ नुकतीच झाहीर झाली आहे. यात जगातील १० श्रीमंतामधून मुकेश अंबानी बाहेर पडले असले तरी अद्याप ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत.

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून टेस्लाचे सीईओ एलॉन मस्क यांचे स्थान अढळ आहे. विशेष म्हणजे, मस्क यांची संपत्ती ८२ टक्क्यांनी आश्चर्यकारकरित्या वाढली आहे. आता त्यांच्याकडे ४२० बिलियन डॉलर्स इतकी संपत्ती आहे.

याच दरम्यान एचसीएल कंपनीच्या प्रमुख आणि महिला उद्योगपती रोशनी नाडर जगातील पाचव्य क्रमाकांच्या महिला उद्योगपती बनल्या आहेत. त्यांच्याकडे ३.५ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. जगातील टॉप १० श्रीमंत महिलांच्या यादीत नाव समाविष्ट होणाऱ्या त्या पहिल्याच भारतीय महिला आहेत. त्यांचे वडील शिव नाडर यांनी एचसीएलमधील ४७ टक्के भागीदारी रोशनी यांच्या नावावर केल्यानंतर त्यांचा क्रमांक वर सरकला आहे.

मुकेश अंबानी आशियातील श्रीमंत व्यक्ती

मुकेश अंबानी यांची जागतिक यादीतून पिछेहाट झाली असली तरी ते अद्याप आशिया आणि भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. अंबानी कुटुंबियांकडे ८.६ लाख कोटी रुपयांची संपत्ती आहे. दरम्यान मागच्या वर्षीपेक्षा त्यांच्य संपत्तीमध्ये १३ टक्के म्हणजेच १ लाख कोटींची घसरण झाली आहे.

दुसऱ्या बाजूला गौतम अदाणी आणि त्यांच्या कुटुंबाची संपत्ती मात्र १३ टक्क्यांनी वाढली आहे. ८.४ लाख कोटी रुपये एवढ्या संपत्तीसह गौतम अदाणी भारतातील दुसऱ्या क्रमाकांचे श्रीमंत व्यक्ती आहेत. तर रोशनी नाडर आणि त्यांचे कुटुंब या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे.