Hurun India Rich List: देशात २९ टक्क्यांनी अब्जाधिशांची संख्या वाढली असून आता ३३४ झाली आहे. हुरून इंडिया रिचलिस्टने २९ ऑगस्ट रोजी अब्जाधिशांची यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार प्रत्येक पाच दिवसांनी एका अब्जाधीशाची संख्या वाढत आहे. या यादीनुसार गौतम अदाणी यांनी मुकेश अंबानी यांना मागे टाकले असून श्रीमंताच्या यादीत प्रथम क्रमांक मिळविला आहे. विशेष म्हणजे या वर्षीच्या यादीत ९० च्या दशकात जन्मलेल्या ११ लोकांचा समावेश आहे. यादीतील २१ वर्षीय कैवल्य वोहरा यांच्या नावाचीही चर्चा होत आहे. वोहरा हे झेप्टो या कंपनीचे सह संस्थापक आहेत. तर दुसरे सह संस्थापक आदित पालिचाही या यादीत आहेत.
कैवल्य वोहराची संपत्ती किती?
वोहरा आणि पालिचा यांनी एकत्र येऊन झेप्टो कंपनीची स्थापना केली आहे. दोघांचेही शिक्षण स्टॅनफोर्ड विद्यापीठातून झालेले आहे. पण संगणक विज्ञान शाखेचा अभ्यासक्रम अर्ध्यातच सोडून त्यांनी स्वतःचा व्यवसाय उभारण्यावर लक्ष केंद्रीत केले. दोघांनी २०२१ साली झेप्टो कंपनीची स्थापना केली. करोना महामारीनंतर घरातच किराणा माल आणि इतर वस्तूंची डिलिव्हरी करण्याची संकल्पना या कंपनीने अमलात आणली. कोणत्याही संपर्काशिवाय ॲपवरून वेगात हवे ते सामान मागविण्याची सुविधा झेप्टोने करून दिली.
झेप्टोची स्थापना होत असताना बाजारात त्यांच्या सारखीच सेवा देणाऱ्या मोठ्या कंपन्यादेखील होत्या. यामध्ये मग ॲमेझॉन, स्विगी, इन्स्टामार्ट, ब्लिंकिट आणि टाटा समूहाच्या बिगबास्केट यासारख्या कंपन्या आहेत.
अवघ्या १९ वर्षी म्हणजेच २०२२ साली कैवल्य वोहराचा समावेश हुरून इंडिया रिचलिस्टमध्ये (Hurun India Rich List) झाला होता. त्यानंतर लागोपाठ तीन वर्ष ते या यादीत आपली जागा कायम ठेवून आहेत.
यावर्षीच्या यादीतील वैशिष्ट काय?
यावर्षी पहिल्यांदाच हुरून इंडिया रिचलिस्टमध्ये (Hurun India Rich List) भारतीय अब्जाधीशांची संख्या ३०० हून अधिक आहे. विविध क्षेत्र जसे की मनोरंजन, कॉर्पोरेट आणि वाणिज्य क्षेत्रातील अनेकांचा या यादीत समावेश झालेला पाहायला मिळाल आहे.
हे ही वाचा >> Zepto to move Bengaluru: आणखी एका बड्या कंपनीचं महाराष्ट्रातून अन्य राज्यात स्थलांतर
गौतम अदाणी प्रथम स्थानी
अदाणी समूहाचे प्रमुख गौतम अदाणी आणि त्यांचे कुटुंबियांनी यावर्षीच्या यादीत प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांची संपत्ती ११.६ लाख कोटी असल्याचे दिसत आहे. त्यांनी रिलायन्सच्या मुकेश अंबानी यांना मागे टाकले आहे. २०२० साली गौतम अदाणी चौथ्या स्थानी होते. मागच्या वर्षभरात अदाणींची संपत्ती ९५ टक्क्यांनी वाढली आहे. हिडेंनबर्गच्या अहवालानंतर थोडासा धक्का बसूनही त्यातून अदाणी समूहाने स्वतःला सावरत चांगली कामगिरी करून दाखविली.
मनोरंजन क्षेत्रातून शाहरुख खानने या यादीत स्थान मिळविले आहे. IPL संघ कोलकाता नाईट रायडर्स आणि चित्रपट निर्मिती कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटमधील त्याच्या भागीदारीमुळे बॉलीवूड अभिनेता शाहरुख खानने वयाच्या ५८ व्या वर्षी ७ हजार ३०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह प्रथमच श्रीमंतांच्या यादीत स्थान मिळवले.