Hyundai Motor India IPO : दक्षिण कोरियाच्या ह्युंदाई मोटर या वाहन निर्माती कंपनीच्या भारतीय ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडने IPO साठी बाजार नियामक सेबीकडे ड्राफ्ट पेपर जमा केले आहेत. या माध्यमातून कंपनीला शेअर बाजाराद्वारे २५ हजार कोटींचे भांडवल गोळा करायचे असल्याचे सांगितले जाते. मनीकंट्रोल वृत्त संकेतस्थळाने याबाबतचे वृत्त दिले आहे. ह्युंदाई मोटर इंडियाचा IPO हा भारतातील आतापर्यंतचा सर्वात मोठा IPO असेल, असे सांगितले जात आहे. यापूर्वी २.७ अब्ज डॉलरच्या किमतीचा सर्वात मोठा भारतीय जीवन विमा निगम अर्थात LIC चा IPO २०२२ साली आला होता.
मनीकंट्रोलने दिलेल्या बातमीनुसार, ह्युंदाई मोटर इंडियाची पालक कंपनी असलेल्या ह्युंदाई मोटरकडून हा IPO ऑफर फॉर सेलच्या स्वरुपात असणार आहे. याअंतर्गत १० रुपयांचे दर्शनी मूल्य असलेले १४ कोटी २१ लाख ९४ हजार ७०० शेअर विकले जाणार आहेत. या आयपीओसाठी ह्युंदाईकडून सिटी, एचएसबीसी सिक्युरिटीज, जेपी मॉर्गन, कोटक महिंद्रा कॅपिटल आणि मॉर्गन स्टॅनली या बँकांना सल्लागार म्हणून निवडले गेले आहे. शार्दूल अमरचंद मंगलदास या विधी संस्थेला कायदेशीर कामासाठी नेमण्यात आले आहे.
ह्युंदाई दुसऱ्या क्रमांकाची मोठी कंपनी
देशात प्रवाशी वाहन विक्रीमध्ये ह्युंदाई मोटर इंडिया आर्थिक वर्ष २०२४ मध्ये सर्वाधिक वाहन विक्री करणारी दुसऱ्या क्रमाकांची मोठी कंपनी ठरली. मागच्या सहा महिन्यात ह्युंदाईच्या प्रतिस्पर्धी मारूती सुझुकी इंडियाच्या शेअरमध्ये २४.३५ टक्क्यांची वाढ झाली आहे. ऑटोकोर प्रोफेशनलच्या माहितीनुसार, ह्युंदाई मोटर इंडियाने वर्ष २०२३ या आर्थिक वर्षात ६० हजार कोटींची उलाढाल केली. तर ४,६५३ कोटींचा नफा कमवला.