आशीष थत्ते

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

व्यवस्थापनाचे महत्त्वाचे तत्त्व म्हणजे सर्व गोष्टी अंदाजपत्रकाप्रमाणे करणे. अंदाजपत्रकात नसेल तर कित्येक परवानग्या घ्याव्या लागतात. यामुळे एकदा अंदाजपत्रक मांडले की, पुढील गोष्टी सोप्या होतात. मात्र तरीही प्रत्येक गोष्टींचा भाव काढण्यासाठी / किंमत निश्चित करण्यासाठी एक वेगळी प्रक्रिया राबवली जाते. मग अगदी महत्त्वाचा कच्चा माल घेणे किंवा लहान-मोठी खरेदी करणे सगळ्यात आधी भाव काढला जातो. याला ‘कोटेशन मागवणे’ असा शब्दप्रयोग रूढ आहे.

मोठ्या आणि बहुराष्ट्रीय कंपन्या तर तीन कोटेशनची पद्धत अवलंबतात. म्हणजेच तीन वेगवेगळ्या पुरवठादारांकडून वस्तू किंवा सेवेची किंमत जाणून घेणे. म्हणजे पुढे जाऊन काही अधिक आणि अनाठायी खर्च होऊ नये आणि किंमत ठरवताना वाटाघाटी करण्यातील वेळदेखील वाचतो. त्यात हल्लीच्या संगणक प्रणालीमध्ये तीन जणांनी एकाच वस्तूचे दिलेले भाव टाकल्याशिवाय पुढे कामाची प्रक्रियादेखील होत नाही. कुठल्याही सरकारी खात्याची खरेदी तर आधी निविदा किंवा कोटेशन मागवून होते.

अर्थात तीन ठिकाणांहून भाव काढणे म्हणजे सगळ्यात कमी किंमत सांगणाऱ्या व्यक्तीला अथवा संस्थेला काम देणे असादेखील होत नाही. कंपन्या त्यांच्या गरजेनुसार बऱ्याच वेळेला तिन्ही पुरवठादारांशी बोलून एखाद्याला काम देतात. प्रत्येकाच्या काही वेगळ्या अटी व नियम असू शकतात. त्यामुळे सगळ्यात कमी किमतीला काम देणे शक्य होते असेदेखील नाही. त्यात एखाद्या पुरवठादाराची पूर्वीची कामगिरी आणि चांगला अनुभव असेल तर कंपनी त्याला सगळ्यात कमी किमतीचे कोटेशनदेखील द्यायला सांगतात. आता तीन कोटेशन का हा प्रश्न मलादेखील नेहमीच पडतो म्हणजे चार किंवा पाच का नाही ?

आपल्या गृहिणी रोजच्या खरेदीसाठी बाहेर पडतात तेव्हा अजाणतेपणे असाच दृष्टिकोन ठेवतात. बाजारात भाजी विकत घ्यायला जाताना ती एका भाजीवाल्याकडून खरेदी करायची असते. पण भाव काढून मगच खरेदी करतात किंवा प्रत्येक वेळेला वेगळ्या भाजीवाल्याकडूनसुद्धा खरेदी होते. मात्र ती भाजी स्वच्छ आणि ताजी आहे का? हे बघून भाजी घेतली जाते. आता यात त्या गृहिणी कुठे तीन भाजीवाल्यांकडून भाव बघून ठरवतात. सुदैवाने रोजच्या प्रवासाला देखील सरकारने रिक्षा किंवा टॅक्सीचे भाडेदर (भाव) ठरवून दिल्यामुळे वाटाघाटीचा वेळ आणि मनस्ताप वाचतो. सध्या किराणा किंवा मोठ्या डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये अगदी गहू-तांदूळ देखील किमतीची पाटी ठेवून विकला जातो. म्हणजे जेणेकरून ग्राहकाने किंमत कमी करण्याची मागणी करू नये. म्हणून असे दरपत्रक, पाटी, लेबले आधीच मांडली जातात.

करोना काळानंतर विमान प्रवाससेवा नियमितपणे पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यानंतर गर्दी हळूहळू वाढल्याने आज बघितलेल्या विमान तिकिटाची किंमत उद्या देखील तीच असेलच असे नाही. घराचे नूतनीकरण करून घेताना किंवा लग्नाची तयारी करताना प्रत्येक गोष्टींमध्ये भाव जाणून आपण खरेदी करतोच. अगदी वर उल्लेखलेल्या कंपन्यांप्रमाणेच होते. काही अपवादात्मक निकडीच्या प्रसंगी वस्तू अथवा सेवेची किंमत किती आहे हे बघितले जात नाही. विशेषतः दवाखान्यामध्ये अचानक जावे लागले तर, पण त्यातसुद्धा जर नियोजित शस्त्रक्रिया असेल तर नक्की खर्च किती होईल याचा अंदाज डॉक्टरांना विचारला जातोच. परत तिथेदेखील तीन डॉक्टरकडे जाऊन सल्ला घेतला जातो. उत्पन्न बघून शस्त्रक्रिया करणारे असतील असे नाही कारण शेवटी आरोग्याचा प्रश्न असतो.
तेव्हा खर्चावर नियंत्रण ठेवताना जास्त भाव खाऊ नका!

आशीष थत्ते
लेखक कॉस्ट अँड मॅनेजमेण्ट अकाउंटंट म्हणून कार्यरत
ई-मेलः ashishpthatte@gmail.com
ट्विटरः @AshishThatte

मराठीतील सर्व अर्थभान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Important principle management is everything according to the budget a quotation tmb 01