US tariff on India: ‘भारत लवकरच त्यांनी लावलेले आयातशुल्क कमी करेल’, असा दावा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी केला. २ एप्रिल रोजी ट्रम्प जगभरातील अनेक देशांवर परस्पर कर लागू करणार आहेत. या मुदतीपूर्वी भारत आपले आयातशुल्क कमी करेल. तसेच अमेरिकेचे सहयोगी असलेले इतर देशही असाच निर्णय घेतील, असेही त्यांनी सांगितले. जगातील अनेक देशांनी अमेरिकेला फसवले आहे, असे ट्रम्प हे सातत्याने सांगत आले आहेत. यामुळेच त्यांनी २ एप्रिल या दिवसाला मुक्ती दिन म्हणून घोषित केले आहे.

व्हाईस हाऊस ओव्हल ऑफिसमध्ये बोलत असताना ट्रम्प यांनी परस्पर करांमुळे अमेरिकेचे मित्र देश चीनच्या जवळ जाऊ शकतात, ही शक्यता फेटाळून लावली. ट्रम्प यांनी त्यांच्या धोरणावर विश्वास व्यक्त करताना युरोपियन युनियनचे उदाहरण दिले. नुकतेच युरोपियन युनियनने वाहनांवरील कर २.५ टक्क्यांनी कमी केला.

“मी ऐकले आहे की, भारत त्यांचे आयातशुल्क मोठ्या प्रमाणात कमी करणार आहे. याप्रमाणेच अनेक देश टॅरिफमध्ये कपात करणार आहेत”, असे विधान ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना केले.

ट्रम्प यांनी ही घोषणा करण्यापूर्वी व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कॅरोलिन लेविट यांनी अनेक देशांच्या अनुचित व्यापर पद्धतींवर प्रकाश टाकला. लेविट पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या, भारत सध्या अमेरिकन कृषी उत्पादनांवर १०० टक्के कर लादतो. तर इतर राष्ट्राकडूनही भरमसाठ कर लावला जातो. युरोपियन युनियन अमेरिकेच्या दुग्धजन्य उत्पादनांवर ५० टक्के शुल्क आकारतात. जपान अमेरिकेच्या तांदळावर ७०० टक्के शुल्क आकारतो आणि कॅनडा अमेरिकन बटर आणि चीजवर जवळपास ३०० टक्के शुल्क आकारतो.

लेविट पुढे म्हणाल्या की, अमेरिकन उत्पादनांवर मोठ्या प्रमाणात कर लावल्यामुळे अमेरिकन उत्पादने इतर देश आयात करत नाहीत. ज्यामुळे अनेक अमेरिकन नागरिक गेल्या काही दशकापासून व्यवसाय आणि रोजगारापासून वंचित राहत आहेत.

आता परस्परांना सहकार्य करत व्यापार करण्याची वेळ आली आहे. यासाठीच अमेरिकन लोकांसाठी जे योग्य आहे, त्याबाबत ऐतिहासिक असे बदल करण्याची भूमिका राष्ट्राध्यक्षांनी घेतली आहे, असेही कॅरोलिन लेविट म्हणाल्या.