अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी २ एप्रिलपासून विदेशी उत्पादनांवर रेसिप्रोकल टॅरिफ अर्थ परस्पर आयातशुल्क लादण्याची घोषणा केलेली आहे. ही मुदत जवळ येत असून ट्रम्प यांच्या निर्णयाकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी विदेशी वाहने आणि वाहनांच्या सुट्या भागावर आयातशुल्क लादल्यामुळे भारतातील ऑटो क्षेत्रावर त्याचा किंचित परिणाम दिसून आला होता. यामुळेच आता भारताने काही वस्तूंवरील आयातशुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. २ एप्रिलपासून भारत ५ उत्पादनांवरील आयातशुल्क कमी करू शकतो, असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच भारताने गुगल करात कपात केली होती.
या उत्पादनांवरील आयातशुल्क होणार कमी
भारताकडून रसायन, इलेक्ट्रॉनिक्स, प्लास्टिक, विमान, पॅराशूट आणि क्रूज जहाज अशा उत्पादनातील विविध वस्तूंवर आयातशुल्क कमी करण्याची शक्यता आहे. सध्या केंद्र सरकारकडून या उत्पादनांवर ७.५ ते १० टक्के आयातशुल्क लावले जाते. डोनाल्ड ट्रम्प यांनी आधी दिलेल्या इशाऱ्यानुसार, जे देश अमेरिकेच्या वस्तूंवर कर लावतात, त्या देशातील उत्पादनांवरही कर लावला जाईल.
उत्पादनांची यादी तयार करण्याचे काम सुरू
भारत सरकारकडून सध्या विविध वस्तूंची यादी तयार करण्याचे काम सुरू आहे. ज्या वस्तू अमेरिकेसाठी महत्त्वाच्या आहेत, अशा वस्तूंची यादी करण्यावर भर असणार आहे. तसेच या वस्तू अमेरिकेतच उत्पादित झालेल्या असाव्यात, हेही सरकारकडून निश्चित केले जाईल. काही काळापूर्वी भारताने बॉर्बन व्हिस्की, मोटारसायकल यासारख्या उत्पादनांवरील आयातशुल्कात कपात केली होती.
जागतिक व्यापर संघटनेच्या नियमांनुसार आयातशुल्काचा निर्णय हा ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ (सर्वाधिक पसंतीच्या राष्ट्राचा) दर्जाच्या आधारावर ठरविला जायला हवा. ‘मोस्ट फेवर्ड नेशन’चा करार केलेल्या देशांमध्ये आयातशुल्क हे समान स्वरुपात असायला हवे.