पुढील चार वर्षांनी २०२७-२८ या आर्थिक वर्षात भारत पाच अब्ज डॉलर्सची अर्थव्यवस्था असलेला देश बनेल, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी आज सांगितले. एवढेच नाही तर याच गतीने आपण पुढे जात राहिलो तर २०४७ पर्यंत आपली अर्थव्यवस्था ३० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते, असेही त्यांनी सांगितले. निर्मला सीतारमन या आज गांधीनगर येथे होत असलेल्या व्हायब्रंट गुजरात ग्लोबल समिट या शिखर परिषदेत सहभागी झाल्या होत्या. यावेळी अर्थव्यवस्थेसंबंधी भाष्य करताना त्यांनी सदर दावा केला.
शिखर परिषदेत बोलत असताना निर्मला सीतारमन म्हणाल्या की, भारताचा जीडीपी सध्या ३.४ अब्ज डॉलर्सच्या आसपास आहे. सध्या भारताची अर्थव्यवस्था ही जगातील पाचव्या क्रमाकांची मोठी अर्थव्यवस्था आहे. अमेरिका, चीन, जपान आणि जर्मनी यांच्यानंतर भारताचा क्रमांक लागतो. चालू आर्थिक वर्षात अर्थव्यवस्थेत ७.३ टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. मागच्या वर्षी ही वाढ ७.२ टक्के होती.
निर्मला सीतारमन पुढे म्हणाल्या, २०२३ पर्यंत मागच्या २३ वर्षात भारतात ९१९ अब्ज डॉलर्सची परकीय गुंतवणूक झालेली आहे. त्यापैकी यातील ६५ टक्के गुंतवणूक मागच्या आठ ते नऊ वर्षात म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात झालेली आहे.
तसेच बँक खाते असलेल्या भारतीयांची संख्या आता ५० कोटींवर पोहोचली आहे. २०१४ साली ही संख्या १५ कोटी होती, असेही त्या यावेळी म्हणाल्या.