भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल सूचक विधान केलं आहे. २०४७ पर्यंत भारताचा संभाव्य विकास दर सरासरी सहा टक्के इतका राहिला तर भारताची अर्थव्यवस्था निम्न मध्यम स्वरुपाची राहील. भारत वेगाने विकसित झाला नाही तर भारत देश श्रीमंत होण्याआधीच म्हातारा देश होईल, अशी शक्यता रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे. राजन यांनी शनिवारी हैदराबाद येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. देशाने जर जलद गतीने विकास साधला नाही, तर आपला देश श्रीमंत होण्याआधीच लोकसंख्याशास्त्रीय पद्धतीनुसार म्हातारा होईल. म्हणजेच त्यावेळी भारतात वृद्धांची संख्या प्रचंड असेल आणि हे अर्थव्यवस्थेवरील एक ओझं असेल, अशा अर्थाचं विधान रघुराम राजन यांनी केलं आहे.
आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन म्हणाले, “सध्याच्या घडीला भारताचा विकास दर वर्षाला सरासरी सहा टक्के इतका आहे. याची गोळाबेरीज केली तर दरवर्षी सहा टक्के या दराने १२ वर्षांनी भारताचा विकास दर दुप्पट होईल. त्यामुळे पुढील २४ वर्षांत भारताचं दरडोई उत्पन्न चौपट होईल. आजच्या घडीला भारताचं दरडोई उत्पन्न अडीच हजार डॉलरपेक्षा थोडं कमी आहे. या संख्येला चारने गुणले तर हा आकडा १० हजार डॉलर इतका होतो. त्यामुळे जर आपण सध्याच्या वाढीच्या दरानुसार गणना केली तर २०४७ पर्यंत आपला देश श्रीमंत होत नाही. २०४७ पर्यंत भारत कमी मध्यम उत्पन्न असलेला देश असेल.”
राजन पुढे म्हणाले की, सध्याच्या वाढीचा वेग सर्व कामगारांना रोजगार देण्यासाठी पुरेसा नाही. काही विकसित देश श्रीमंत होण्याआधी उत्पादन क्षेत्राऐवजी सेवा क्षेत्रांकडे वळले आहेत. हे देश प्रामुख्याने सेवा आधारित अर्थव्यवस्था आहेत. श्रीमंत देशांमध्ये ७० टक्के कर्मचारी सेवा क्षेत्रात काम करतात. तर २० टक्के लोक उत्पादन क्षेत्रात कार्यरत आहेत. याशिवाय प्रत्येकी पाच टक्के लोक बांधकाम आणि कृषी क्षेत्रात कार्यरत आहेत.