भारतीय तरुणांनी प्रत्येक आठवड्यात ७० तास काम केलं पाहिजे. म्हणजेच रोज १० तास काम केलं पाहिजे असं वक्तव्य Infosys चे संस्थापक नारायण मूर्ती यांनी केलं आहे. The Record या पॉडकास्टच्या दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यासाठी त्यांनी दुसऱ्या महायुद्धाचंही उदाहरण दिलं आहे.
दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीच्या लोकांनी अनेक तास काम केलं. भारतीय तरुणांनीही अशाच पद्धतीने काम करण्याची आवश्यकता आहे. कामात दिरंगाई करण्यापेक्षा आपलं काम लवकरात लवकर पूर्ण केलं पाहिजे असंही नारायण मूर्ती म्हणाले होते. मात्र नारायण मूर्तीच नाही इतर अनेक दिग्गजांनीही असाच सल्ला तरुणांना दिला आहे. यानंतर इतर दिग्गजांनीही नारायण मूर्ती यांचं समर्थन केलं आहे. तसंच अनेक दिग्गजांनीही असेच सल्ले याआधी दिले आहेत.
जगातल्या दिग्गजांनी काय म्हटलं आहे?
‘ओला’ चे सीईओ भाविश अग्रवाल म्हणाले की भारतीयांना करोनाच्या महामारीनंतर अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासाठी युवकांनी दर आठवड्याला ६० तास तरी काम केलं पाहिजे. काही वर्षांपूर्वी ‘अलीबाबा’ ही कंपनी सुरु करणारे जॅक मा यांनीही एक ब्लॉग पोस्ट केला होता. त्यात त्यांनी कर्मचाऱ्यांना दिवसाला बारा तास काम करण्याचा सल्ला दिला होता. सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत जे काम करतील त्यांना जास्त कष्ट घेतल्याचा पुरस्कार मिळेल असंही त्यांनी म्हटलं होतं. एवढंच नाही तर स्टार्ट अप सुरु करायचं असेल तरीही बारा तास काम करण्याची तयारी हवी असंही ते म्हणाले होते.
एलॉन मस्क यांनी १०० तास काम करण्याची तयारी ठेवा म्हटलं होतं
जगातले सर्वात श्रीमंत उद्योजक एलॉन मस्क यांनी गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात ट्विटर ही कंपनी विकत घेतली. त्यावेळी त्यांनी कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना १०० तासांहून अधिक काळ काम करण्याचा सल्ला दिला होता. २०२२ मध्ये त्यांनी कर्मचाऱ्यांना मेल पाठवला होता. ज्यात त्यांनी म्हटलं होतं की आठवड्याला १०० तास काम करा.
याचप्रमाणे बॉम्बे शेविंग कंपनीचे सीईओ शंतनु देशपांडे यांनी LinkedIn च्या त्यांच्या पोस्टमध्ये म्हटलं होतं की जे फ्रेशर्स आहेत त्यांनी दिवसाचे १८ तास कामात गढून गेलं पाहिजे. तुम्ही मज्जा करा, चांगलं खा-प्या पण दिवसाचे १८ तास काम करा. आपल्या करिअरच्या सुरुवातीची पाच वर्षे तरी १८ तास काम नव्या येणाऱ्या युवकांनी केलं पाहिजे. NDTV ने या विषयीचं वृत्त दिलं आहे.