India’s GDP Growth: मागच्या दहा वर्षांत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन अर्थात ‘जीडीपी’ हा जवळपास दुप्पट झाला आहे. २०१५ साली २.१ ट्रिलियन डॉलर असलेला जीडीपी २०२५ साली ४.३ ट्रिलियन डॉलरवर पोहोचला आहे. दहा वर्षांत यात १०५ टक्के वाढ झाली असल्याची आकडेवारी आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून देण्यात आली आहे. जीडीपीच्या या वाढत्या गतीमुळे आता भारत अमेरिका, चीन, जर्मनी आणि जपान नंतर पाचवा सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश बनला आहे.
जपानला याच वर्षी मागे टाकू
आयएमएफच्या माहितीनुसार, भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था असलेल्या जपानला मागे टाकण्याच्या जवळपास पोहोचला आहे. जपानचा जीडीपी सध्या ४.४ ट्रिलियन डॉलर इतका आहे. भारत २०२५ मध्ये तिसऱ्या तिमाहीतच हा आकडा गाठू शकतो. जर भारताची विकासची गती याचपद्धतीने कायम राहिली तर २०२७ साली दुसऱ्या तिमाहीपर्यंत जर्मनीलाही मागे टाकले जाईल. जर्मनी सध्या जगातील तिसऱ्या क्रमाकांची अर्थव्यवस्था असेलला देश आहे. जर्मनीचा विद्यमान जीडीपी ४.९ ट्रिलियन डॉलर इतका आहे.
भारतावर कर्ज किती?
विकासाची गती वाढत असताना लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे अमेरिका आणि चीनच्या तुलनेत भारतावरील कर्ज कमी आहे. मार्च २०२५ मध्ये अमेरिकेचे राष्ट्रीय कर्ज ३६.२२ ट्रिलियन डॉलर, तर चीनचे राष्ट्रीय कर्ज सप्टेंबर २०२४ पर्यंत २.५२ ट्रिलियन डॉलर इतके होते. तुलनेने भारतावर कमी कर्ज असून सप्टेंबर २०२४ मध्ये भारतावरील एकूण कर्ज ७१२ अब्ज डॉलर इतके होते.
वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मध्यंतरी भारताच्या दशकभरातील आर्थिक प्रगतीचा आलेख अद्वितीय असल्याचे म्हटले होते. दशकभरात भारताचा जीडीपी दुप्पट झाला आहे. भारताने जी७, जी२० आणि ब्रिक्स संघटनेतील सर्व देशांना मागे टाकले आहे, असेही ते म्हणाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताचा आर्थिक प्रगतीचा आलेख चढा राहिला आहे. भारत लवकरच जगातील तिसरी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता.
भारताच्या आर्थिक प्रगतीचा आलेख आणि महत्त्वाचे टप्पे
- २००७ साली भारताच्या जीडीपीने १ ट्रिलियन डॉलरचा टप्पा गाठला होता. यासाठी भारताला ६० वर्ष लागली.
- २०१४ साली जीडीपी दुप्पट होऊन २ ट्रिलियन डॉलरवर पोहोचला.
- करोनाचे संकट आणि अर्थव्यवस्थेची मंद गती असतानाही २०२१ साली ३ ट्रिलियनचा टप्पा ओलांडला गेला.
- ३ ट्रिलियनपासून ४ ट्रिलियनचा टप्पा गाठण्यासाठी भारताला केवळ चार वर्षांचा काळ लागला.