India Super Rich and Income Tax: भारतातील श्रीमंत लोक आपल्या उत्पन्नाच्या तुलनेत कमी प्राप्तीकर भरतात. एका संशोधनातून ही बाब समोर आली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी समितीचे सदस्य राम सिंह यांनी हे संशोधन केले आहे. राम सिंह हे दिल्ली स्कूल ऑफ इकोनॉमिक्सचे संचालकही होते. या संशोधनासाठी लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांचे शपथपत्र, फोर्ब्सची श्रीमंत लोकांची यादी आणि प्राप्तीकर विभागाची आकडेवारी संदर्भ म्हणून वापरण्यात आली आहे.

या संशोधनातून समोर आले की, श्रीमंत लोक आपल्या संपत्तीमधून मिळणारे उत्पन्न प्राप्तीकरात दाखवत नाहीत. याचा अर्थ प्राप्तीकर भरावा लागू नये, यासाठी ते मिळकत कमी असल्याचे दाखवतात. तसेच जो व्यक्ती जितका श्रींमत आहे, तितकाच तो संपत्तीच्या तुलनेत कमी प्राप्तीकर भरत आहे, असेही या संशोधनातून पुढे आले आहे.

भारतातील श्रीमंत व्यक्ती किती कर भरतात?

श्रीमंत लोक आपल्या संपत्तीच्या तुलनेत जेवढे उत्पन्न दाखवतात, ते त्यांच्या खऱ्या उत्पन्नापेक्षा कमी असते. जर एखाद्या श्रीमंत कुटुंबाची संपत्ती १ टक्क्याने वाढली असेल तर ते प्राप्तीकर भरताना केवळ ०.६ टक्के इतकी दाखवतात. श्रीमंत लोकांना प्राप्तीकर कमी भरायचा असतो, त्यामुळेच ते आपले उत्पन्न कमी दाखवत असतात, असे निरीक्षण या संशोधनाच्या माध्यमातून नोंदविले आहे.

या संशोधनाच्या अहवालानुसार, भारतातील कर रचना ही संपत्तीच्या प्रकरणात प्रोग्रेसिव्ह नाही. म्हणजेच श्रीमंतांना त्यांच्य संपत्तीच्या तुलनेत अधिक कर बसत नाही. जे लोक माध्यमे आणि सार्वजनिक जीवनात वारंवार येतात, ते आपला प्राप्तीकर जाहिर करण्यात उत्सुक असतात.

किती कर भरला जातो?

राम सिंह यांच्या संशोधनानुसार, सर्वात श्रीमंत असलेले ५ टक्के लोक आपल्या संपत्तीमधून मिळणाऱ्या उत्पन्नाचा पाचवा भागही प्राप्तीकराच्या रुपात भरत नाहीत. तर ०.१ टक्के अतिश्रीमंत लोक जो प्राप्तीकर भरतात तो त्यांच्या संपत्तीमधून होणाऱ्या उत्पन्नाच्या दहाव्या भागा इतका असतो.

फोर्ब्सच्या श्रीमंताच्या यादीत असलेले अतिश्रीमंत लोक आपल्या संपत्तीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर केवळ ५ टक्के प्राप्तीकर भारतात.