Shankar Sharma Investment Advice: शेअर बाजारातील दिग्गज गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी आपल्या नातेवाईकांना शेअर मार्केटपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून शेअर बाजारात सातत्याने घसरण होत आहे. त्यातच अनेक म्युच्युअल फंड खाती बंद झाली आहेत. शेअर बाजारात पडझड सुरू असतानाच अनुभवी गुंतवणूकदार शंकर शर्मा यांनी गुंतवणुकीचे इतर पर्याय सांगितले आहेत. तसेच आपली बहीण आणि मेव्हण्याला त्यांनी दिलेले गुंतवणुकीचे इतर पर्याय आता लाभदायक ठरत असल्याचे ते म्हणाले.

जीक्वांट इन्व्हेस्टेकचे संस्थापक असलेल्या शर्मा यांनी एक्सवर एक पोस्ट टाकली आहे. ज्यात त्यांनी म्हटले, “माझी बहीण आणि मेव्हणे एका छोट्या शहरात राहतात. ते मागच्या ३५ वर्षांपासून मला शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीबाबतचा सल्ला मागत होते. मी त्यांना सांगायचो की, यापासून दूर रहा. हे तुमच्यासाठी योग्य नाही. तुमच्याकडील ४० टक्के पैसे एफडीत, ३० टक्के पैसे सोन्यामध्ये आणि ३० टक्के पैसे मुख्य शहरापासून २५ किमी दूर कुठेतरी जमीन गुंतवा.”

शर्मा यांनी पुढे सांगितले की, या सल्ल्यानंतर आता त्यांच्याकडे चांगली गुंतवणूक झाली आहे. कोणत्याही तणावाशिवाय त्यांनी चांगली संपत्ती निर्माण केली आहे. आरबीआयचे बदलणारे नियम, गव्हर्नर कोण आहे, युएस फेडची परिस्थिती काय आहे, कर्ज, जीडीपी आणि व्यापार युद्ध याची कसलीही चिंता न करता त्यांना गुंतवणुकीचा चांगला परतावा मिळत आहे.

मार्केटमधून सर्वांनाच लाभ मिळत नाही

शर्मा यांच्या एक्स पोस्टवर एका युजरने कमेंट केली की, शेअर बाजारातूनही चांगली संपत्ती निर्माण करता येते. यावर शर्मा म्हणाले की, शेअर बाजारात सर्वांनाच नफा कमवता येतो, असे नाही. यात नशीबाची मोठी भूमिका असते. त्यांनी सांगितले की, अतिशय मोजक्या लोकांना मागच्या ३५ वर्षांत शेअर बाजारातून चांगला नफा मिळवता आलेला आहे. आम्ही शेअर बाजारातून चागंला नफा मिळवू शकलो, कारण आम्ही नशीबवान होतो.

शंकर शर्मा यांनी आपले मत व्यक्त केल्यानंतर सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. काहींनी त्यांच्या पारंपरिक गुंतवणुकीच्या पर्यायाला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी शेअर बाजारात विचार करून घेतलेली जोखीम फायदेशीर ठरत असल्याचे म्हटले आहे.

Story img Loader